गोवा राज्यात किनारपट्टी नियमन क्षेत्राचे सर्वाधिक उल्लंघन !
‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन केल्याच्या देशभरातील एकूण १ सहस्र ८८१ प्रकरणांपैकी ९७७ प्रकरणे गोव्यातील !
पणजी, ७ मार्च (वार्ता.) – देशभरातील किनारपट्टी नियमन क्षेत्राचे (‘सी.आर्.झेड्.’ – कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे) सर्वाधिक उल्लंघन गोव्यात झाले आहे. गोव्याला १०१ कि.मी. लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून या ठिकाणी ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन केल्याची ९७७ प्रकरणे नोंद झाली आहेत. (याकडे गोवा सरकारने लक्ष देऊन समुद्रकिनार्यावरील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, हीच जनतेची अपेक्षा !- संपादक) गुजरात राज्याला देशभरात सर्वाधिक लांब म्हणजे १ सहस्र २१४ कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली असून तेथे ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन केल्याची केवळ ३९ प्रकरणे नोंद झाली आहेत. महाराष्ट्राला ६५२ कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली असून तेथे उल्लंघनाची ५५६ प्रकरणे नोंद आहेत. याउलट आंध्रप्रदेशला ९७३ कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभूनही तेथे ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन झाल्याचे एकही प्रकरण नोंद नाही, तसेच अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांतही ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन झाल्याचे एकही प्रकरण नोंद नाही.
(सौजन्य : Prudent Media Goa)
संपूर्ण देशाला ७ सहस्र ५१६ कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे, तर देशभरात समुद्रकिनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरणाकडे ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन झाल्याची एकूण
१ सहस्र ८८१ प्रकरणे नोंद झाली आहेत.