औरंगजेबाचे फलक फडकावून आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्यांवर कारवाई करू ! – चंद्रकांत पाटील, मंत्री
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथे संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामांतर करणाच्या मागणीसाठी एम्.आय.एम्. पक्षाच्या वतीने साखळी उपोषण चालू आहे. रात्री विलंबापर्यंत चालू असलेल्या उपोषणातील भाषणांत आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात आहेत. औरंगजेबाचे छायाचित्र हातात घेऊन ‘औरंगजेब हा सर्वांचा बाप होता’, असे सांगून त्याचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नेते अंबादास दानवे यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’ हे सूत्र मांडून केली. या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोषी उपोषणकर्त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अंबादास दानवे म्हणाले, ‘‘संभाजीनगर येथे ‘एम्.आय.एम्’ पक्षाच्या वतीने साखळी उपोषण चालू असतांना तेथे बिर्याणी खाल्ली जाते, तसेच रात्री १० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती असतांना रात्री १२ वाजेपर्यंत भाषण चालू असते. या उपोषणात औरंगजेबाचे फलक हातात घेऊन ‘औरंगजेब हा कोण होता, तर तो सर्वांचा बाप होता’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. इतरांचे उपोषण चालू असतांना ते तत्परतेने बंद पाडणारे पोलीस या उपोषणातील उचापतींकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांनी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्यांवर कारवाई करावी.’’
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या, ‘‘उपोषणात औरंगजेबाचे फलक लावण्याचे कारस्थान हे समाजकंटकांचे होते, हे आता आक्षेपार्ह विधानांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाई करावी, असे मी निर्देश देत आहे. या उपोषणात ‘औरंगजेबाने काम केले होते’, असेही म्हटले गेले. औरंगजेबाने कोणते काम केले ? असे चालणार नाही. लोकांचा संयम आणि परीक्षा पाहू नये. हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. उपोषणात चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे धागेदोरे पडताळून पाहून कारवाई करावी.’’
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘एम्.आय.एम्.’च्या उपोषणात चालू असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेतली जाईल. या उपोषणात असेच वक्तव्य चालू राहिले, तर तो ते देशद्रोह्यापर्यंत जाऊ शकतील. रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक वाजवण्यास मुदत वाढवून दिली जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गृहमंत्र्यांना दोषींवर कारवाई करण्याविषयी सांगितले जाईल.
संपादकीय भूमिकाछत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण ! |