कोलगाव (सिंधुदुर्ग) येथे नवीन इमारत बांधूनही शाळा भरते जुन्याच धोकादायक इमारतीत !
श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांसाठी कृती करा ! – पालकांची मागणी
सावंतवाडी – तालुक्यातील कोलगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची नवी इमारत बांधून १ वर्ष पूर्ण झाले आहे. असे असतांनाही जुन्या धोकादायक इमारतीमध्येच शाळा भरवली जाते. जुनी इमारत कोसळून मोठा अनर्थ घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांनी आणखी किती काळ जुन्या इमारतीत बसायचे ? असे प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
५९ लाख रुपये खर्च करून ५ वर्गखोल्या असलेली शाळेची नवीन इमारत बांधून मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाली आहे; मात्र अद्याप ही इमारत संबंधित प्रशासनाच्या कह्यात देण्यात आली नाही. श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने शाळेच्या नवीन इमारतीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे लक्षात येत नाही का ? |