अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या वतीने कोकणामध्ये २४ कुंडी गायत्री महायज्ञ
रत्नागिरी, ७ मार्च (वार्ता.) – हरिद्वारच्या गायत्री परिवार या संस्थेद्वारे कोकणामध्ये ९, १३, १७ आणि २२ मार्च या दिवशी अनुक्रमे कुडाळ, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथे २४ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक यज्ञामध्ये पहिल्या दिवशी कलशयात्रा, दुसर्या आणि तिसर्या दिवशी २४ कुंडी यज्ञामध्ये औषधी वनस्पतींची गायत्री मंत्रासह आहुती अन् चौथ्या दिवशी पूर्णाहुती असा ४ दिवसांचा कार्यक्रम असेल. याशिवाय सकाळी ध्यान, योग आणि सायंकाळी १ सहस्र दिव्यांचा दीपयज्ञ, तसेच स्थानिक भजनी मंडळे अन् कलाकार यांचे कार्यक्रम सादर करण्यात येतील. प्रत्येक यज्ञामध्ये भाग घेणार्यांना गायत्री मंत्राचा अर्थ, उच्चार आणि जपाद्वारे स्वतःमध्ये प्रतिभा विकसित करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली जाणार आहे. यज्ञाच्या ठिकाणी पुंसवन, नामकरण, विद्यारंभ, मंत्रदीक्षा इत्यादी संस्कारही केले जातील.
गायत्रीचे थोर उपासक आणि सिद्धहस्त लेखक अन् साहित्यकार पंडित श्रीराम शर्मा आचार्य (वर्ष १९११ ते १९९०) यांनी स्थापन केलेली गायत्री परिवार ही संस्था जनसामान्यांमध्ये जातीभेद न पाळता गायत्री मंत्राच्या साधनेद्वारे प्रतिभा विकसित करण्याची आणि भारतीय संस्कृतीच्या शिकवणीप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा देते. हे कार्य संस्थेद्वारे भारतात आणि भारताबाहेरील सुमारे ८० देशांत पन्नास वर्षांपासून चालू आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रात गायत्री चेतना केंद्रांच्या स्थापनेद्वारे हे कार्य मोठ्या प्रमाणावर चालू आहे; परंतु कोकण विभागात या कार्याची वाढ करण्यासाठी हे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमांसाठी कुडाळ येथे श्री. चंदूभाई पटेल, राजापूर येथे श्री. विलास जोशी, रत्नागिरी येथे श्री. सुधीर माने आणि चिपळूण येथे श्री. सुरेश चितळे हे स्थानीक समन्वयक असतील. प्रत्यक्ष यज्ञ करण्यासाठी हरिद्वार येथून ४ जणांचे पथक येणार आहे. मंत्रोच्चारक आणि प्रवचनकार, तसेच गायक आणि वादक या पथकात असतील. यज्ञात भाग घेणार्यांना स्त्री, पुरुष आणि जातीभेद इत्यादी कसलाही भेदभाव न करता यज्ञकुंडाभोवती बसून मंत्र म्हणत स्वतःच्या हाताने आहुती देता येईल. यज्ञ शाळेच्या पवित्र सुगंधित वातावरणात व्यसनमुक्तीचे आणि आपली बुद्धी, शक्ती आणि श्रम समाज अन् देश यांसाठी उपयोगात आणण्याचे संकल्प दिले जातील.
कुडाळ, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील अन् पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आणि स्वत:च्या संस्कृतीविषयी आस्था असणार्या सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये अवश्य भाग घ्यावा आणि संस्कृतीच्या जागरणाचे कार्य पुढे चालू ठेवावे, असे आवाहन गायत्री परिवाराकडून करण्यात येत आहे.