चिपळुणात भटक्या कुत्र्यांचे केले जात आहे निर्बिजीकरण !

भटके कुत्रे

चिपळूण (रत्नागिरी) – शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत चालली असून नागरिकांच्या तक्रारींनंतर येथील नगर परिषद प्रशासन आणि कराड येथील ‘व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेकडून शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे.

चिपळूण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर लाखो रुपयांचा खर्च केला आहे; मात्र तरीही सर्वत्र, सार्वजनिक ठिकाणी, तसेच गल्लोगल्ली कुत्र्यांचा त्रास जनसामान्यांना सहन करावा लागत आहे. या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, हा एकमेव पर्याय असल्याने नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

‘व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि ‘अँटी रेबीज’ हे लसीकरण विनामूल्य करण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिले आहे. त्यानुसार ६ मार्चपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे चालू करण्यात आले आहे.