खेड पोलिसांनी ‘अपहरण नाट्या’चे केले तत्परतेने अन्वेषण !
मांडवी एक्सप्रेस थांबवून ३ अल्पवयीन मुलींना घेतले कह्यात !
खेड (रत्नागिरी) – ७ मार्चला सकाळी ११.३० वाजता मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांना काशिमीरा पोलीस ठाणे येथून भा.दं.वि.सं कलम ३६३ अन्वये गुन्ह्यातील ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्यांचे सध्याचे लोकेशन (वर्तमान स्थान) हे धावती ‘मांडवी एक्सप्रेस’ असल्याविषयी माहिती देण्यात आली.
या संपर्कानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांनी २ पोलीस अधिकारी आणि ८ अंमलदार अशी वेगळी पथके तयार केली आणि १२.०५ वाजता खेड रेल्वेस्थानक येथे येणार्या ‘मांडवी एक्सप्रेस’च्या तपासणीच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय राखून ही रेल्वे ५ मिनिटे अधिक कालावधीकरता खेड रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आली.
होळीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये अधिक गर्दी आणि वेळेची मर्यादा असतांनाही या तीनही मुलींचा ‘मांडवी एक्सप्रेस’ मध्ये शोध घेण्यात आला आणि शेवटी या मुली एका बोगीत सापडल्या. त्यानंतर तीनही मुलींना खेड पोलीस ठाण्यात आणले.
मुलींकडे अधिक चौकशी केली असता समजले की, त्या मुली त्यांच्या घराशेजारील बागेमध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यांना घरी जाण्याकरता उशीर झाल्याने त्यांचे पालक त्यांना ओरडतील, या भीतीने त्या निघाल्या होत्या.
या तीनही मुलींना त्यांच्या पालकांकडे सुपुर्द करण्याकरता काशिमीरा पोलीस ठाणे येथील पथक खेड पोलीस ठाण्याकरता रवाना झाले आहे.