सातारा येथे ४० जणांच्या टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई !
सातारा, ७ मार्च (वार्ता.) – येथील जुगार, मटका यांसारख्या अवैध व्यवसाय चालवणार्या समीर कच्चीसह त्याच्या ४० सहकार्यांच्या टोळीवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
समीर शेख पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी समीर कच्ची चालवत असलेल्या अनेक अवैध व्यवसायांची माहिती समीर शेख यांना मिळाली. माहितीची पडताळणी करून सापळा रचून सातारा पोलिसांच्या वतीने विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामध्ये समीर कच्चीसह ४० हून अधिक सहकारी गजाआड करण्यात आले होते. या वेळी १६ लाख २६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला होता. समीर कच्ची याच्यासह त्याच्या सहकार्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे कच्ची आणि त्याचे सहकारी यांच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सातारा पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई केली. तालुका पोलीस ठाण्याकडून तसा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी या प्रस्तावाला अनुमती दिली असून लवकरच याविषयी सर्व पुराव्यानिशी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाअवैध व्यवसाय करणारी ४० जणांची टोळी राज्यात कार्यरत असणे हे कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आल्याचेच लक्षण होय ! |