श्रीमती भाग्यश्री आणेकर यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. मुलाच्या अपघातात अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने भीती वाटणे, प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करून त्यांच्या छायाचित्राला प्रदक्षिणा घालणे आणि त्यानंतर मुलगा घायाळ स्थितीत घरी येणे : एकदा माझा मुलगा त्याच्या मित्रांच्या समवेत पन्हाळ्याला फिरायला गेला होता. त्या वेळी आम्ही कोल्हापूर येथे नवीन सदनिकेत रहात होतो. तेथे आमची अधिक ओळख नव्हती. मी रात्री ११.३० वाजेपर्यंत माझ्या मुलाची वाट पाहिली. तो घरी आला नसल्याने मला फार भीती वाटत होती. मी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आसंदीत ठेवले आणि त्यांना प्रार्थना केली. मी रडत-रडत रात्री २.३० वाजेपर्यंत त्या छायाचित्राला प्रदक्षिणा घालत होते. नंतर मी थकल्यामुळे आसंदीत कोलमडून पडले. तेवढ्यात दाराची घंटी वाजली आणि माझा मुलगा मला दिसला. त्याच्या तोंडवळा आणि गुडघे यांना मार लागला होता. त्याला पाहून मला धस्स् झाले. तो घरी आल्यावर मला गुरूंप्रती कृतज्ञता वाटली.
१ आ. मुलाच्या मित्राने ‘तुमच्या मुलाचा मोठा अपघात होऊनही तो गुरूंच्या कृपेने जिवंत आहे’, असे सांगणे : त्यानंतर एक मासाने मुलाचा मित्र मला म्हणाला, ‘‘आमचा अपघात झाल्यावर आम्ही अन्य गाडीतील लोकांना बोलावत होतो; पण भरधाव वेगाने जाणार्या गाड्यांतील लोकांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही. तुमचा मुलगा बेशुद्ध झाला होता. मी तुमच्या गुरूंना प्रार्थना केली. मुलगा थोड्या वेळाने शुद्धीवर आला. तुमच्या गुरूंनी आम्हाला कोल्हापूर येथे आणले. तुमचे गुरु महान आहेत.’’ तेव्हा मला प.पू. भक्तराज महाराज यांना प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व लक्षात आले. गुरूंनी माझ्या मुलाला वाचवले. त्या वेळी माझी गुरूंवरील श्रद्धा वृद्धींगत झाली.
– श्रीमती भाग्यश्री मोहन आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र (११.१.२०२२)
|