कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?
‘भारतात सर्वत्रच कुत्र्यांची समस्या भयावह होत चालली आहे. त्यांचा त्रास केवळ लहान मुलांनाच नव्हे, तर सर्व वयोगटातील लोकांना भेडसावतो. राजस्थानच्या सिरोही येथे एका रुग्णालयात एका व्यक्तीला क्षयरोगाच्या कक्षात भरती करण्यात आले होते. त्याची पत्नी आणि एक मासाचे लहान मूल रुग्णालयातच कक्षाबाहेर निजलेले असतांना एक कुत्रा तिथे आला अन् त्याने बाळाला तोंडात धरून तेथून पळ काढला. आईला लक्षात येताच ती कुत्र्यामागे धावली; परंतु तोपर्यंत त्याने बाळाला फाडून खाल्ले होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये उत्तरप्रदेशच्या नोएडा येथे अशीच एक घटना घडली. यामध्ये एका कुत्र्याने ७ मासांच्या बाळावर आक्रमण करत त्याचे आतडे बाहेर काढले. अनेक घंटे शस्त्रक्रिया करूनही त्या इवल्याशा जिवाला वाचवण्यात डॉक्टरांच्या हाती अपयशच आले. गेल्या वर्षी एप्रिल मासात श्रीनगरच्या दालगेट परिसरात भटक्या कुत्र्यांनी १७ पर्यटकांसह तब्बल ३९ लोकांचा चावा घेतला. त्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले. ‘कुत्र्यांचे चावे अधिक घातक कि प्रशासकीय लचके ?’, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, असा सात्त्विक संताप कुणी व्यक्त केल्यास त्यात चूक ते काय ?’ (२.३.२०२३)