अवकाळी पावसामुळे हानी झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !
मुंबई – अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्च या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांसह राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांसमवेत ऑनलाईन कॉन्फरन्स घेऊन हानी झालेल्या पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना तातडीने आधार मिळाला पाहिजे. ‘शासन संकटग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी उभे आहे’, असे आश्वासक प्रतिपादन केले. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात कांदा आणि गहू यांच्या, तर नाशिक येथे पावसामुळे द्राक्षाच्या पिकाची हानी झाली. जळगाव येथे केळीच्या झाडांची हानी झाली. ढगाळ हवामान आणि पाऊस यांमुळे कोकणातील आंबा पिकाची हानी होण्याची शक्यता आहे.