‘रमी’चा जुगार !
अगदी २५ ते ३० वर्षांपूर्वीपर्यंत घरोघरी पत्ते, कॅरम, बुद्धीबळ असे खेळ सर्रास खेळले जात होते. मनोरंजन, आनंद मिळवणे किंवा वेळ घालवणे, हे त्यामागचे प्रमुख उद्देश होते. त्यामुळे केवळ लहान मुलेच नाही, तर मोठी माणसेही हे खेळ आवडीने खेळत. त्या वेळी ‘इंटरनेट’ नावाची ‘अलिबाबाची गुहा’ आणि ‘भ्रमणभाष’ नावाची ‘जादूची कांडी’ अस्तित्वात नव्हती. ‘इडियट बॉक्स’ नावाच्या दूरदर्शन यंत्राचाही आताएवढा अतिरेक नव्हता. सुट्यांच्या दिवसांत घंटोन्घंटे घरोघरी खेळला जाणारा ‘मेंढीकोट’ आणि ‘रमी’ जेव्हा गणेशोत्सवात पैसे लावून रात्र रात्र जागवून खेळले जाऊ लागले, तेव्हा तो ‘जुगार’ झाला. आता ‘स्क्रिन टच’ भ्रमणभाषचे युग आल्यावर त्यावर पत्त्यांचा खेळ चालू झाला; पण त्यालाही पैसे लावून खेळण्यास लावणारी आस्थापने निघाली आणि त्यांनी पत्त्यांचा जुगार खेळण्याची विज्ञापनेही चालू केली. हा हा म्हणता या विज्ञापनांनी संकेतस्थळे आणि दूरचित्रवाहिन्या यांवर इतका धुमाकूळ घातला की, त्यांच्यामुळे समाजाची किती अपरिमित हानी होत आहे, याचे भान ना प्रसारमाध्यमांना राहिले, ना संकेतस्थळांना, ना प्रशासनाला ! आता त्याचा कडेलोट झाला आहे, तरी अद्यापही याविषयी कुणालाही काहीही वाटत नाही.
प्रसारमाध्यमांची समाजघातक कृती !
एकीकडे समाजाचे प्रबोधन करण्याचा आव आणणार्या वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळे ‘पैसे लावून रमी खेळण्या’ची विज्ञापनेही प्रसिद्ध करतात. ‘पैशासाठी, म्हणजेच स्वार्थासाठी आपण समाजाला ‘जुगारी’ बनवत आहोत किंवा जुगाराच्या आहारी जाण्यास उद्युक्त अथवा प्रोत्साहित करत आहोत’, असे या तथाकथित सामाजिक बांधीलकीचा आव आणणार्या वाहिन्या किंवा संकेतस्थळे यांना वाटत नाही. ही पत्रकारिता समाजहितैषी आहे ? कि समाजघातक ? यांचे आत्मपरीक्षण त्यांनी करणे आवश्यक आहे. दारू आणि तंबाखू ही समाजाला व्यसनी बनवणारी विज्ञापने जितकी घातक आहेत, तितकीच समाजाला जुगारी बनवणारी ही विज्ञापनेही घातक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या माध्यमांना खरोखरच समाजहित साधायचे आहे, ती अशी विज्ञापने कितीही पैसे मिळाले, तरी घेणार नाहीत.
‘जंगली’ रमी !
सध्या ‘जंगली रमी’ हा ‘ऑनलाईन’ जुगार महाराष्ट्रासह देशभरात पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ तरुण मुले किंवा जुगारीच नव्हे, तर कार्यालयांतील कर्मचारीही त्याच्या आहारी गेले आहेत. विशेषतः सरकारी कार्यालयातील कर्मचारी या जुगाराच्या आहारी गेल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामाच्या वेळेतच कर्मचारी हा रमीचा जुगार भ्रमणभाषवर खेळत असल्याचे आढळून आले आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. जुगाराला ‘व्यसन’ का म्हटले गेले आहे ? याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. व्यसनाच्या आहारी गेलेला माणून स्वतःवर संयम ठेवू शकत नाही. व्यसनामुळे चक्क कामही बाजूला ठेवून जुगार खेळणार्या कर्मचार्यांना ‘ते चूक करत आहेत’, याची जाणीव रहात नाही. त्यामुळे ते स्वतःची, त्यासमवेत कामे खोळंबवून जनतेचीही ते मोठी हानी करत आहेत.
सरकारने जुगार रोखणे आवश्यक !
राज्य आणि केंद्र सरकारांनी अशा कर्मचार्यांना शोधून त्यांच्यावर कडक निर्बंध लादणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे, तर कार्यालनीय कामाचा वेळ अन्य गोष्टींत वाया घालवणे वा कार्यालयीन कामाच्या वेळेत जुगार खेळणे या दोघांच्या संदर्भात काही नियम किंवा पुढे जाऊन कायदाही करणे आवश्यक आहे. वर्ष २०१५ मध्ये न्यायालयाने या खेळाला ‘कौशल्यावर आधारित’ खेळ म्हटले आहे. कुठल्याही खेळात कौशल्य हे असतेच; पण कुठल्याही खेळात ‘पैसे लावण्याचा’ विषय आला की, तो जुगारच होतो; मग ते पत्ते असू दे; नाही तर क्रिकेट. सद्यःस्थितीत पत्ते खेळण्यास ‘जंगला’एवढे जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘२० ते ४४ वर्षे वयोगटातील देशभरातील ८ कोटींहून अधिक नागरिक ‘ऑनलाईन’ रमी खेळत आहेत’, असे अनुमान एका संस्थेने वर्तवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. ‘ऑनलाईन लॉटरी’वर बंधने घालण्यास राज्य सरकार काही खटल्यांचा हवाला देत त्याची मर्यादा व्यक्त करत असेल, तर ‘ऑनलाईन जुगारा’विषयीही ते तशाच प्रकारच्या मर्यादा असल्याचे सांगू शकते. जसे गावातील महिलांचे संघटन वाढले की, त्या गावापुरती दारूबंदी होते; पण महसुलापोटी सरसकट राज्यभरात दारूबंदी होत नाही. बहुतांश सर्व समाजघातकी अपप्रकार बंद करण्यामागे भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाही आड येते. बारबालांपासून ‘पॉर्न’ चित्रपटांपर्यंत कुठलेही अपप्रकार पूर्ण बंद करण्यात कायदे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मानवाधिकार, भ्रष्टाचार, व्यसनी लोकांची मानसिकता, प्रामाणिकपणे धन कमावण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव, सरकार आणि प्रशासन यांची इच्छाशक्ती आदी अनेक गोष्टी आड येतात, हे खरे आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन जुगार’ समूळ रोखण्यासाठी जनतेवर आंदोलने करायची किंवा जनहित याचिका प्रविष्ट करायची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने जनहितासाठी ‘ऑनलाईन जुगारा’वर बंदी आणून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी.
‘गैरमार्गाने पैसे मिळवणे’, हे धर्मशास्त्रानुसार पापच आहे. त्यामुळे जुगारासारख्या माणसाचे जीवन उद़्ध्वस्त करणार्या खेळातून पैसे कमावण्यापेक्षा अधिक मेहनत करून पैसे कमावणे केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे. एखाद्याच्या प्रारब्धात जेवढा पैसा असतो, तेवढाच त्याला मिळतो. त्यामुळे प्रामाणिकपणे पैसे कमावण्याचा संस्कार जनमानसावर होण्यासाठी आणि त्याची अंतरंगात जाणीव करून देणारे धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता या निमित्ताने पुन्हा पुन्हा अधोरेखित होते !
‘ऑनलाईन रमी जुगारा’चे दुष्परिणाम ओळखून सरकारने त्यावर वेळीच बंदी घालावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! |