घरगुती गॅस सिलेंडरच्या झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ करवीर ठाकरे गटाची निदर्शने !
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – केंद्रात भाजप शासन आल्यापासून खाद्योपयोगी वस्तूंपासून अनेक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यातच केंद्रातील भाजप सरकारने गॅस सिलेंडर आणि इंधन यांची दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. सातत्याने होणार्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे मूल्यही वाढत आहे. तरी घरगुती गॅस सिलेंडरची झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली उंचगाव येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. या प्रसंगी महिलांनी रस्त्यावर चूल मांडून त्यावर भाकर्या थापून, तसेच गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध केला.
या प्रसंगी उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच विराग करी, पोपट दांगट, अवधूत साळोखे, विक्रम चौगुले, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, फेरीवाले महिला संघटनेच्या संगीता आवळे, शोभा वासुदेव, शशिकला भोसले यांसह अन्य उपस्थित होते.
सांगलीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात आंदोलन !
सांगली – येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात ठाकरे गटाच्या वतीने महागाईच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शहर समन्वयक प्रसाद रिसवडे, महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार, अनिल शेटे यांसह अन्य उपस्थित होते.