रतलाम (मध्यप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलांची शरीर सौष्ठव स्पर्धा !
|
रतलाम (मध्यप्रदेश) – येथे श्री हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलांची शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली. मध्यप्रदेशातील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या संदर्भात प्रसारित झालेल्या व्हिडिओत स्पर्धक महिला अत्यंत तोकड्या कपड्यांत दिसत असून शेजारी श्री हनुमानाची मूर्ती दिसत आहे. काँग्रेसने या स्पर्धेवर आक्षेप घेत हा श्री हनुमानाचा अवमान असल्याचे आरोप केला आहे. यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेनंतर गंगाजल शिंपडून, तसेच हनुमान चालिसाचे पठण करून मंचाची शुद्धीही केली.
भाजपने क्षमा मागावी ! – काँग्रेस
काँग्रेसचे माध्यम सल्लागार पीयूष बाबेले यांनी ‘मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम ‘हिंदूंचा आणि भगवान हनुमानाचा अनादर करणारा आहे’, असे सांगत भाजपने याविषयी क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे.
काँग्रेसवाल्यांची महिला स्पर्धकांवर वाईट दृष्टी ! – भाजप
काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देतांना भाजपचे प्रवक्ते हितेश बाजपेयी यांनी ‘काँग्रेसवाले महिलांना कुस्ती, जिम्नॅस्टिक्स किंवा पोहण्याच्या स्पर्धांमध्ये पाहू इच्छित नाहीत; कारण त्यामुळे त्यांच्यातील राक्षस जागा होतो. या स्पर्धेतील महिलांकडे काँग्रेसवाल्यांची वाईट दृष्टी होती. त्यांना लाज वाटत नाही का ?’, असा प्रत्यारोप केला.
संपादकीय भूमिकादेवतांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घेणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे ! त्यादृष्टीने प्रत्येक हिंदूने सजग रहायला हवे ! |