सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग), ६ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील श्री नारायण मंदिरानजीक ६ मार्च या दिवशी आदर्श होलिकोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी माजगाव येथील धर्मप्रेमी श्री. अजित वारंग यांच्या हस्ते होळीचे विधीवत् पूजन करण्यात आले, तर श्री. श्रीपाद कशाळीकर यांनी पौरोहित्य केले. या वेळी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.
होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. यासाठी हिंदूंमध्ये प्रबोधन व्हावे म्हणून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे आदर्श होलिकोत्सव साजरा करत आहेत.
(सौजन्य : No.1 Nirdhar News)
सावंतवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला धर्मप्रेमी सर्वश्री अंबादास इंगळे, राजू जोशी (आचरा), राजू भीमराव जोशी (पडेल), भालचंद्र जोशी (कुडाळ), रवि भिसे (सावंतवाडी), निवृत्त मुख्याध्यापक अंकुश गवस (माजगाव), चंद्रकांत गुडेकर (कामळेवीर), गजानन सातार्डेकर (माजी उपसरपंच, मळगाव) यांच्यासह सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.