एस्.टी. महामंडळात येणार ८ सहस्र वातानुकूलित गाड्या ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ
‘खासगी ट्रॅव्हल्स’प्रमाणे दर्जेदार सुविधा देण्यासाठी एस्.टी. महामंडळ करणार प्रयत्न !
मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – खासगी ट्रॅव्हल्सच्या दर्जेदार गाड्यांच्या तुलननेत एस्.टी.च्या गाड्या जुनाट असल्यामुळे स्पर्धेच्या काळात अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे एस्.टी. महामंडळ ८ सहस्र वातानुकूलित बस खरेदी करणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे एस्.टी.लाही प्रवाशांना दर्जेदार सुविधा देता येणार असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.
या गाड्या इलेक्ट्रिक असणार असून त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी ५ सहस्र १५० चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, सोलापूर या शहरांमध्ये ही बससेवा चालू करण्यात येणार आहे. याचे मुख्य केंद्र पुणे येथे असणार आहे. सध्या डिझेलवर असलेल्या १ सहस्र एस्.टी. गाड्याही ‘सी.एन्.जी.’ (संकुचित नैसर्गिक वायू) मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत या गाड्या चालू करण्यात येतील. एस्.टी.चा सर्वाधिक व्यय हा कर्मचार्यांचे वेतन आणि इंधनावरील व्यय यांवर होतो. यामुळे इंधनावरील व्यय अल्प होणार आहे, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण न्यून होण्यासही साहाय्य होईल. कोरोनाच्या काळानंतर एस्.टी.च्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. नवीन गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना पुन्हा एस्.टी.कडे वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शेखर चन्ने यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.