देश हिंदु राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल ! – अभिनेते शरद पोंक्षे
हिंदूंनो, हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांना मोडून काढण्याच्या षड्यंत्राला विरोध करा !
पुणे – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्व असल्याचे मनावर कोरले पाहिजे. देश हिंदु राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल. हिंदु धर्मावर आघात करण्याचे राजकारण चालू आहे; म्हणून सावरकर अधिक डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत’, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ते ‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थे’च्या (नाशिक) युवा आघाडी पुणे केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘स्वा. सावरकर विचार दर्शन’ या विषयावर बोलत होते.
अभिनेते पोंक्षे पुढे म्हणाले, ‘‘सावरकरांना सातत्याने अपमानित करण्यात येत आहे. स्वतंत्र भारतात सावरकरांना अपमान करण्याची एकही संधी नेहरू सरकारने सोडली नाही. हिंदु धर्म, हिंदुत्वाची शक्ती मोडून काढण्याचे षड्यंत्र चालू आहे. सावरकर समजून घेणे सोपे नाही. सातत्याने वाचन करावे लागते. आपण सावरकरप्रेमी असतो; पण ५० – ६० टक्के लोकांनाही त्यांच्यावर झालेले आरोप मोडून काढावेसे वाटत नाहीत. त्यामुळे सावरकरांना अधिकाधिक समजून घ्या आणि इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या महापुरुषांविषयी कुणी बोलले, तर समोरच्याला वस्तूनिष्ठ माहिती देणे आवश्यक आहे, त्याकरता वाचन करायला हवे, हे समजून घेतले पाहिजे.’’