सेवा हाच माणुसकीचा धर्म ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

पुणे – वहाणे हा जसा पाण्‍याचा धर्म आहे, त्‍याप्रमाणे सेवा हा माणुसकीचा धर्म आहे, असे मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्‍यक्‍त केले. ‘सेवा भवन’ या बहुउद्देशीय सेवा प्रकल्‍पाच्‍या उद़्‍घाटन समारंभात ते बोलत होते. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समिती, जनकल्‍याण सेवा फाऊंडेशन आणि ‘डॉ. हेडगेवार स्‍मारक सेवानिधी’ या संस्‍थांनी मिळून सेवा भवनाची निर्मिती केली आहे. कोथरूड परिसरातील गांधी लॉन्‍स येथे झालेल्‍या उद़्‍घाटनाच्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सर्व संघचालकांच्‍या हस्‍ते जनकल्‍याण समितीच्‍या ५० वर्षांचा आढावा घेणार्‍या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशन, तसेच ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मालशे यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

सेवा भवन येथे रुग्‍णांच्‍या नातेवाइकांसाठी रहाण्‍याची सोय, १५० लोकांचे निवास आणि भोजन, २० डायलीसिस युनिट, रोज ६० रुग्‍णांचे डायलीसिस (डायलीसिस – यंत्राद्वारे रक्‍ताचे शुद्धीकरण करणे.) अल्‍प दरात सेवा भवन येथे होणार आहे, तसेच रुग्‍णाच्‍या नातेवाइकांच्‍या समुपदेशनाचे कार्य, सेवाभावी संस्‍थांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षणाचे सभागृह आणि प्रशिक्षण केंद्रही चालू केले आहे. या कार्यक्रमाला पश्‍चिम महाराष्‍ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, जनकल्‍याण समितीचे महाराष्‍ट्र प्रांत अध्‍यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, ‘फाऊंडेशन’चे संचालक महेश लेले, ‘डॉ. हेडगेवार सेवा निधी संस्‍थे’चे कोषाध्‍यक्ष अभय माटे आदी उपस्‍थित होते. विनायक डंबीर यांनी प्रकल्‍पाची माहिती दिली, तर उमा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प.पू. सरसंघचालक भागवत यांनी सांगितलेली अन्‍य सूत्रे पुढीलप्रमाणे

१. स्‍वतःच्‍या परिश्रमापेक्षा समाजाचे ऋण आपल्‍यावर अधिक असते, त्‍यामुळे सेवा हे आपले कर्तव्‍य आहे.

२. एकांतात आत्‍मसाधना आणि लोकांतात परोपकार सेवा ही साधना आहे. सर्वांग सुंदर समाजाकडून जगाची सर्व प्रकारची सेवा सामर्थ्‍याने आणि सद़्‍भावनेने होईल. त्‍यातून विश्‍वशांतीचे साम्राज्‍य उभे राहील.

३. संवेदनशील अंत:करणाचे लोक सेवा करतात. स्‍वार्थ, अपरिहार्यता आणि भीतीपोटी कोणतीही सेवा होऊ शकत नाही.

४. मानवी मनातील संवेदना हे अस्‍तित्‍वाच्‍या एकतेचे स्‍वरूप आहे. मिळवणार्‍यापेक्षा वाटणार्‍याचा सन्‍मान करण्‍याची परंपरा आहे.

५. शिवभावे जीवसेवा, समरसता आणि सद़्‍भावना आवश्‍यक आहे.