१४ ते १८ मार्च या कालावधीत शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ महानाट्याचे सादरीकरण !
मुंबई – महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेच्या वैभवशाली इतिहासात अजरामर झालेले महानाट्य ‘जाणता राजा’ पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. १४ ते १८ मार्च या कालावधीत शिवाजी पार्क (दादर) येथे म्हणजेच शिवतीर्थावर या महानाट्याचे प्रयोग करण्यात येणार आहेत. रसिकांना ते विनामूल्य पहाता येतील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची संकल्पना आणि लिखाण यातून हे महानाट्य साकारले गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते छत्रपतींचा राज्याभिषेक या दोन महत्त्वाच्या घटनांमधील हे महानाट्य आहे. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असलेल्या प्रशस्त रंगमंचावर हत्ती, घोडे आणि २०० कलाकारांसह हे महानाट्य साकारले जाईल.