देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘उग्ररथ शांतीविधी’च्या वेळी त्यांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती !
‘९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात माझा ‘उग्ररथ शांतीविधी’ (टीप) झाला. ‘हा विधी आश्रमासारख्या पवित्र आणि सात्त्विक ठिकाणी होणार, म्हणजे त्याचे फळ अनेक पटींनी मिळणार’, हे निश्चितच होते.
टीप – वयाच्या ५० व्या वर्षानंतर व्यक्तीच्या इंद्रियांची क्षमता न्यून होत जाते. ‘ती पूर्ववत् व्हावी आणि उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगता यावे’, यासाठी वयाच्या ५० व्या वर्षानंतर प्रत्येक ५ वर्षांनी विधी केले जातात. त्यांतील वयाच्या ६० व्या वर्षी ‘उग्ररथ शांतीविधी’ केला जातो. (भाग १)
१. झालेला त्रास
विधीच्या दुसर्या सत्रात पूजन चालू असतांना मला खोकल्याची उबळ येत होती. त्या वेळी ‘प्राणशक्तीवहन उपचारपद्धती’नुसार उपाय शोधून ते अन्य संतांना करण्यास सांगितल्यावर माझा तो त्रास दूर झाला.
२. आलेल्या अनुभूती
अ. विधीच्या २ दिवस आधीपासून आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. विधीच्या दिवशी चैतन्य वाढले असल्याचे मला जाणवले.
आ. त्या दिवशी विधी चालू होण्यापूर्वी माझ्याकडून सनातनच्या ३ गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणी मानसपूजा झाली होती. त्या वेळी निर्माण झालेल्या भावामुळे पुढील विधींच्या वेळी मला लाभ झाला.
इ. विधीचे ठिकाण सनातन आश्रमासारखे पवित्र आणि चैतन्यमय असल्यामुळे विधी करतांना चैतन्य जाणवून तेथे विविध देवतांचे अस्तित्व जाणवत होते. त्याचाही सर्वांना लाभ पुष्कळ झाला.
ई. विधीच्या आरंभीच विधीचे मुख्य दैवत मार्कंडेयऋषि असल्याचे सांगितल्यामुळे माझ्या मनात त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण होत होता.
उ. विधी चालू असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताई (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांची आठवण होत होती. त्यामुळे विधी करतांना माझे अनुसंधान टिकून रहात होते.
ऊ. विधीच्या आरंभीच्या पूजेतील एकेक कृती करत असतांना ‘प्रत्यक्ष देवता तेथे आहेत’, असा भाव गुरुदेवांच्या कृपेमुळे माझ्या मनात निर्माण झाला आणि मला त्या विधीतील चैतन्य ग्रहण करता येत होते. साधारण दीड घंटा पहिले सत्र चालले; परंतु मला इतका वेळ बसता येत नसतांनाही गुरुदेवांच्या कृपेमुळे कंबर दुखण्याची जाणीव झाली नाही.
ए. ‘संपूर्ण विधी होईपर्यंतचा वेळ गुरुदेवांच्या कृपेमुळे कसा निघून गेला ?’, हेही मला कळले नाही. त्या वेळी मला देहाची जाणीव झाली नाही किंवा काहीही त्रास झाला नाही.
ऐ. कार्यक्रमाच्या ठिकाणी पू. रमेश गडकरीकाका सनातन संस्थेच्या वतीने मला भेटवस्तू देण्यासाठी आले. त्या वेळी ‘प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आले आहेत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. माझी ती स्थिती बराच वेळ टिकून होती.
ओ. विधीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी आश्रमातील साधकांना थोड्या थोड्या वेळासाठी यज्ञस्थळी यायला सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांनाही पुष्कळ अनुभूती आल्या.
औ. विधीच्या दिवशी रात्री ९ नंतर ‘होमाच्या ठिकाणी कसे वाटते ?’, हे अनुभवण्यासाठी मी तेथे गेलो. तेथे जाऊन डोळे मिटल्यावर माझे मन लगेच शांत होऊन निर्विचार झाले. त्या स्थितीमध्ये आजूबाजूला असलेल्या अन्य कोणत्याही स्थितीची मला जाणीव नव्हती.
अं. विधीच्या अंतिम टप्प्यात नातेवाइकांची भेट झाल्यावर काही जणांना माझ्या कपाळावरील कुंकवाच्या टिळ्यात एक विशिष्ट चिन्ह उमटल्याचे दिसले.
क. दुसर्या दिवशी सकाळी ‘होमकुंडामध्ये पांढर्या रंगाच्या विभूतीमध्ये काळ्या रंगाचा ‘ॐ’ उमटला आहे’, असे कळले. त्याच्याकडे पाहिल्यावर ‘त्यामधून चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले. त्यासाठी मी ‘यज्ञकुंडाच्या वर माझा तळहात ठेवून त्यातून किती अंतरापर्यंत चैतन्य प्रक्षेपण होत आहे ?’, हे पाहिले. तेव्हा ‘त्यातून ऊर्ध्व दिशेने साधारण ७ – ८ फुटांपेक्षाही अधिक उंचीपर्यंत पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे माझ्या लक्षात आले; तसेच कुंडाच्या आजूबाजूला उभे राहिल्यावर ‘आपण पोकळीत उभे आहोत’, असे मला वाटले.
ख. विधी चालू असतांना विविध छायाचित्रे घेतली गेली. या छायाचित्रांमध्ये विधी चालू असतांना यज्ञातील अग्नीच्या ज्वाळांमध्ये ‘पक्ष्याचा पंख, गणपति, श्रीकृष्ण’ इत्यादी आकृत्या दिसत होत्या.
४. कृतज्ञता
अ. हिंदु धर्मामध्ये मानवी जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक विधी करण्यास सांगितले आहेत. त्यांचा मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम होऊन देवतांची कृपा होते आणि त्या जिवाला साधनेसाठी उत्तम आरोग्य मिळते. अशा विविध विधींची योजना करणार्या ऋषींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
आ. ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, केवळ आपल्या संकल्पामुळेच हा ‘उग्ररथ शांतीविधी’ निर्विघ्नपणे झाला. ‘हे विधी करतांना आपणच मला विविध देवतांच्या अस्तित्वाची अनुभूती दिली आणि आपल्या कृपेमुळेच मला या विधीचा पूर्णपणे लाभ होणार आहे’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
इदं न मम । (म्हणजे ‘हे माझे नाही.’) (क्रमशः)
– (सद़्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |