खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांचे उद्गार !
१९ मार्चच्या सभेत व्याजासहित उत्तर देऊ !
खेड (रत्नागिरी) – उद्धव ठाकरे यांनी आमचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. बाहेरची माणसे आणून स्थानिक राजकारण करता येत नाही. त्याच मैदानात सभा आम्ही १९ मार्चला घेणार असून या सभेला व्याजासहित उत्तर देऊ. या प्रत्युत्तर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई आणि आमदार भरत गोगावले उपस्थित रहाणार आहेत, असे उद्गार शिवसेना नेते रामदास कदम यांनी काढले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड येथील गोळीबार मैदानात होत असलेल्या सार्वजनिक सभेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
(सौजन्य : TV9 Marathi)
रामदास कदम पुढे म्हणाले की,
१. उद्धव ठाकरे हे असे नेते आहेत की, स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला राजकारणातून संपवायचे आणि दुसर्याचा आमदार भाड्याने विकत घ्यायचा. असे प्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केले नाहीत.
२. मुंबई, पुणे आणि ठाणे येथून भाड्याची माणसे आणून कितीही प्रयत्न केले, तरी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना राजकारणातून कुणीही संपवू शकत नाही.
३. एकदा नाही, १०० वेळा जरी उद्धव ठाकरे येथे आले, तरी तेवढे आमचेच मताधिक्य वाढलेले दिसेल.
४. दापोली मतदारसंघातील २-४ टक्के तरी लोक ठाकरे यांच्या समवेत आहेत का ?