सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधकांमध्ये होत असलेले पालट आणि साधकाला आलेल्या अनुभूती
‘सद्गुरु स्वाती खाडये काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या वेळी ‘सद्गुरु स्वातीताईंनी आम्हा काही साधकांच्याही व्यष्टी साधनेचा आढावा घ्यावा’, असे मला वाटत होते. त्याप्रमाणे अनेक सेवांमध्ये व्यस्त असूनही त्या वेळ काढून कधीही खंड न पडता आमच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेत आहेत. त्यात साधक मनमोकळेपणाने आणि प्रांजळपणे व्यष्टी साधनेचा आढावा देण्याचा प्रयत्न करतात.
१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर जाणवलेली सूत्रे
सद्गुरु स्वातीताईंनी व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या प्रारंभी भावप्रयोग घ्यायला आरंभ केला. त्यांनी सोमवारी भगवान शिव, मंगळवारी गणपति, गुरुवारी दत्तगुरु, शुक्रवारी भवानीमाता, शनिवारी मारुतिराया यांच्याशी संबंधित वेगवेगळे भावप्रयोग घेतले.
१ अ. भावप्रयोग केल्यामुळे दिवसभर उत्साही वाटणे आणि व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मिळणे : आरंभी माझी व्यष्टी साधना पाट्याटाकूप्रमाणे होत होती. मला त्यात आनंद मिळत नव्हता. सद्गुरु स्वातीताईंनी व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या प्रारंभी भावप्रयोग घ्यायला आरंभ केला. त्यांनी सोमवारी भगवान शिव, मंगळवारी गणपति, गुरुवारी दत्तगुरु, शुक्रवारी भवानीमाता, शनिवारी मारुतिराया यांच्याशी संबंधित वेगवेगळे भावप्रयोग घेतले. त्याच वेळी भ्रमणभाषच्या पडद्यावर (स्क्रीनवर) संबंधित देवतेचे सनातन-निर्मित सात्त्विक चित्र दाखवले जायचे. त्या वेळी माझी भावजागृती होत असे. त्यांनी ‘गोकुळात कृष्णासमवेत मानस खेळणे, मानस तुळजापूर येथे जाणे, मानस पंढरपूरच्या वारीतील चैतन्य अनुभवणे, संत तुकाराम महाराज आणि कान्होपात्रा यांच्यासारखी विठ्ठलभक्ती करणे’, असे भावप्रयोग सांगितले. त्यांनी सांगितलेले भावप्रयोग मला दिवसभर आठवत असल्यामुळे माझे मन उत्साही रहाते आणि मला व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मिळते.
१ आ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत असतांना भावाची जोड देण्यास सांगून संतांच्या बोधप्रद गोष्टी सांगणे : ‘साधकांचा आढावा ऐकल्यानंतर ‘ते कुठे न्यून पडत आहेत आणि त्यांनी आणखी काय प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सद्गुरु ताई मार्गदर्शन करतात. ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत असतांना भावाची जोड कशी द्यायची’, हेही त्या सातत्याने सांगतात. त्या महाभारत, रामायण यांतील आणि संतांच्या बोधप्रद गोष्टी सांगतात. त्या साधकांना ‘या कथांकडे आध्यात्मिक दृष्टीने कसे बघायचे ?’, हेही शिकवतात.
१ इ. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्यानुसार स्वयंसूचना सत्र करण्यापूर्वी शरिरावरील आवरण काढणे आणि सरस्वतीदेवीला प्रार्थना करून स्वयंसूचना सत्रे केल्याने ‘देवीच अनेक वर्षांपासूनचे स्वभावदोष दूर करत आहे’, असे जाणवणे : सद्गुरु स्वातीताईंनी माझा आढावा घेणे चालू करण्यापूर्वी माझी स्वयंसूचना सत्रे अंतर्मनातून होत नव्हती. ‘माझ्यातील स्वभावदोष दूर होणार नाहीत’, अशी माझी नकारात्मक मानसिकता झाली होती. सद्गुरु ताईंनी आम्हाला स्वतःवरील आवरण काढून स्वयंसूचना सत्र करायला सांगितले. त्यांनी आम्हाला ‘साक्षात् सरस्वतीदेवीच मुखात वास करत आहे आणि तीच स्वयंसूचना सत्र करवून घेत आहे’, असा भावप्रयोग करायला सांगितला. तेव्हापासून मी सरस्वतीदेवीला प्रार्थना करून स्वयंसूचना सत्र करत आहे. ‘माझ्यात अनेक वर्षांपासून असलेले स्वभावदोष देवीच दूर करत आहे’, असे मला जाणवते.
१ ई. थकवा आल्यावर सद्गुरु स्वातीताईंनी इंद्रियांची मानस बैठक घेण्यास सांगणे : साधकांना काही वेळा थकवा येत असल्याने सद्गुरु ताईंनी आम्हाला इंद्रियांची मानस बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार इंद्रियांची बैठक घेतल्यावर ‘सर्व इंद्रिये एकमेकांना दोषांची जाणीव करून देत आहेत आणि त्यांचा एकमेकांविषयी कृतज्ञताभावही वाढत आहे’, असे मला जाणवले.
१ उ. कृतज्ञताभाव जागृत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला साधनेसाठी केलेल्या साहाय्याचे स्मरण करण्यास सांगणे : कृतज्ञताभाव जागृत रहाण्यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आपली साधना व्हावी यासाठी काय केले ? आपल्याला कठीण प्रसंगातून कसे बाहेर काढले ?’, याचे स्मरण करायला सांगितले. त्यामुळे माझ्यातील भाव सदैव टिकून रहाण्यास साहाय्य होते.
१ ऊ. देवतांची स्तोत्रे म्हणतांना त्या देवतांना अनुभवण्याचा प्रयत्न करायला सांगणे : सद्गुरु ताईंनी साधकांना देवतांची स्तोत्रे म्हणतांना त्या देवतांना अनुभवण्याचे प्रयत्न करायला सांगितले, उदा. बगलामुखी स्तोत्र ऐकतांना तिचे रूप डोळ्यांसमोर आणणे; मारुतिस्तोत्र म्हणत असतांना ‘मारुति दृष्ट काढत आहे’, असा भाव ठेवणे; नामजप भावपूर्ण होत नसेल, तर भगवान श्रीकृष्णाच्या नेत्रांमध्ये पाहून किंवा त्याच्या चरणांवर बोट ठेवून नामजप करणे; रात्री झोपतांना नामजपाचे सरंक्षककवच करणे इत्यादी.
१ ए. चुकांवर प्रायश्चित घ्यायला सांगणे : साधकांकडून होणार्या लहान-मोठ्या चुकांसाठी सद्गुरु ताईंनी त्यांना स्वतःला चिमटा काढणे; सनातन पंचांग वितरण करणे; जी सेवा करतांना संघर्ष होतो, तीच सेवा मागून घेणे इत्यादी प्रायश्चित्ते घ्यायला सांगितली. त्यामुळे आता एखादी चूक होतांना मला तिची आधीच जाणीव होते.
सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेली विविध देवतांची भावार्चना !सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या प्रारंभी भावजागृतीचा प्रयोग घेणे चालू केले. त्यांनी सोमवारी शिव, मंगळवारी श्री गणपति, गुरुवारी श्री दत्तगुरु, शुक्रवारी श्री भवानीमाता आणि शनिवारी मारुतिराया यांच्याशी संबंधित वेगवेगळे भाववृद्धी प्रयोग घेतले. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सद्गुरु स्वातीताई साधकांकडून करून घेत असलेले भावजागृतीचे विविध प्रयोग पुढे दिले आहेत. १. सोमवारी शिवाच्या दर्शनाला जाणे ‘आपण शिव मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. शिवालयात प्रवेश केल्यावर भगवान शिवाच्या गाभार्यात जाऊन आपण शिवपिंडीचे दर्शन घेत आहोत. त्या वेळी आपले मन पुष्कळ हलके झाले आहे. शिवपिंडीला बेल आणि फुले वाहिल्यावर आपले मन, बुद्धी आणि शरीर यांच्याभोवती असलेले वाईट शक्तीचे आवरण दूर होत आहे. ‘आपल्या शरिरात चैतन्य प्रवेश करत आहे’, असे जाणवत आहे. शिवपिंडीचे दर्शन घेतल्यावर ‘साक्षात् गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांचेच दर्शन घेत आहोत’, असे आपल्याला जाणवत आहे. (क्रमश:) – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. संग्राहक : श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), पुणे (५.१.२०२३) |
२. सद्गुरु स्वाती खाडये साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना आलेल्या अनुभूती
आमच्यापेक्षा सद्गुरु स्वातीताईंनाच ‘आमच्यात पालट व्हावेत’, अशी तळमळ असते. त्यामुळे त्या सातत्याने आमचा आढावा घेत आहेत.
अ. व्यष्टी आढाव्यासाठी अनेक साधक वेगवेगळ्या ठिकाणांहून ‘ऑनलाईन’ जोडलेले असले, तरीही ‘आम्ही एकाच ठिकाणी बसलो आहोत’, असे मला जाणवते.
आ. सद्गुरु स्वातीताईंचा अमूल्य असा आढावा सत्संग चालू असतांना ‘साक्षात् देवता सूक्ष्मातून उपस्थित असतात’, असे मला जाणवते.
इ. सद्गुरु ताईंचे मार्गदर्शन चालू असतांना कधी कधी कोकिळा ‘कुहू कुहू’ करत असते. चिमणीचा आणि मोराचा आवाज सर्वांना ऐकू येतो. त्या वेळी ‘तेही आत्मनिवेदन करून सद्गुरूंच्या चरणी क्षमायाचना करत आहेत’, असे मला वाटते.
‘सद्गुरु स्वातीताईंनी आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेणे’, ही परात्पर गुरुमाऊलींनी आमच्यासारख्या पामरांवर केलेली कृपा आहे. ‘त्यांची आमच्यावरील कृपा अशीच निरंतर राहू दे आणि परात्पर गुरुमाऊलीला अपेक्षित असे पालट आमच्यामध्ये होऊ देत’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. महेश पाठक (आताची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (९.१२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |