छत्रपती संभाजीनगर विभागात १० दिवसांमध्ये पकडले ९७ कॉपीबहाद्दर !
सरकारच्या ‘कॉपीमुक्त अभियाना’चा फज्जा !
संभाजीनगर – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या मंडळाच्या लेखी परीक्षा चालू असून या परीक्षांमध्ये कॉपी (नक्कल) केली जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून मोठा गाजावाजा करत कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा दावा करण्यात आला होता; मात्र या अभियानाला शिक्षण क्षेत्रातील लोकांनी हरताळ फासला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या वेळी १० दिवसांत ९७ कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले आहे. ज्यात सर्वाधिक जालना जिल्ह्यात कॉपीचे प्रकार समोर आले आहेत.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परीक्षा चालू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात; म्हणून शिक्षण मंडळासह महसूल आणि पोलीस विभागाचीही पथके शाळा अन् महाविद्यालयात आहेत, तसेच शिक्षण विभागातील विविध भरारी पथकांकडून परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पहाणी करण्यात येते; मात्र असे असतांना परीक्षेत अपप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यात ३८ कॉपीबहाद्दरांना पकडले असून हिंगोली ३२, छत्रपती संभाजीनगर २६ आणि बीड जिल्ह्यात १ अशी कॉपी करणार्यांची संख्या आहे.
विशेष म्हणजे परभणी येथे अद्यापपर्यंत एकही कॉपीचे प्रकरण उजेडात आलेले नाही. संभाजीनगर विभागातील ५ जिल्ह्यांतून १ लाख ६९ सहस्र विद्यार्थी इयत्ता १२ वीच्या परीक्षा देत आहेत, तर इयत्ता १० वीसाठी एकूण १ लाख ८० सहस्र २१० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल विभागाची १०, तर शिक्षण विभागाची ६, अशी १६ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विभागातील प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याच्या भ्रमणभाषमध्ये पेपर आढळल्याने ३ विद्यार्थ्यांसह अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद !
इयत्ता १२ वीच्या गणित पेपरफुटीचे मुंबईशी संबंध !
मुंबई – इयत्ता १२ वीच्या गणिताच्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा संबंध मुंबई येथील विद्यार्थ्यांशीही असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथील डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील विज्ञान शाखेतील परीक्षार्थीच्या भ्रमणभाषमध्ये १० वाजून १७ मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या परीक्षार्थीकडून भ्रमणभाषसंच जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी ३ विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. बुलढाणा येथील कथित पेपरफुटी प्रकरणी ‘पेपर फुटला नाही’, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिकाआधुनिक शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे नैतिकता उंचावत नसून कसेही करून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची घातक मानसिकता बळावत आहे. |