रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना सुचलेल्या प्रार्थना आणि त्यांनी अनुभवलेला आनंद !
‘२२.३.२०२१ या दिवशी सकाळी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरती झाल्यावर नामजप करत बसले होते. तेव्हा मला वातावरणामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले. देवतांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवून मला कृतज्ञता वाटू लागली. मला देवपूजेमध्ये वापरलेल्या प्रत्येक उपकरणामध्ये समर्पणभाव जाणवला. त्या उपकरणांकडे पहातांना त्यांच्यातील गुण लक्षात येऊन ‘ते गुण स्वतःमध्ये आणायचे आहेत’, असे मला वाटले. तेव्हा माझ्याकडून गुरुचरणी आर्ततेने विविध प्रार्थना झाल्या.
१. ध्यानमंदिरातील उपकरणांकडे पहातांना सुचलेल्या प्रार्थना
अ. शंख : ‘शंखाच्या दैवी नादाने उत्साह वाढतो आणि आपोआप प्रार्थना होऊन चैतन्य मिळते’, असे माझ्या लक्षात आले. माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, या जिवाला तुमच्या पूजेतील शंख होता येऊ दे.’
आ. घंटा : घंटेच्या नादाने देवतांना आवाहन केले जाते. तेव्हा विविध देवतांच्या तत्त्वांची जागृती होऊन त्यांचे पूजास्थानी आगमन होते. घंटेच्या नादाने सर्वांचे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होते. हे ईश्वरा, या जिवाला देवाच्या पूजेतील घंटा होता येऊ दे.
इ. फुले : हे गुरुमाऊली, या जिवाला आपल्या चरणांशी वाहिली जाणारी भाग्यवान फुले होता येऊ दे. त्यामुळे मला अधिक आनंदी आणि ईश्वरी चरणांशी रहाण्याचे मोठे सौभाग्य लाभेल.
ई. उदबत्ती : हे विष्णुस्वरूप गुरुदेव, या जिवाला उदबत्ती होता येऊ दे. ती जळत असतांना तिचे अस्तित्व संपत जाते; पण तिच्यातील भावसुगंध सर्वत्र दरवळू लागतो. देवा, केवढा हा समर्पणभाव ! हे श्रीमन्नारायणा, आम्हा सर्वांमध्ये असा समर्पणभाव निर्माण होऊ दे.
उ. निरांजन : हे ज्योतिमय गुरुदेव, या जिवाला आरतीचे निरांजन होता येऊ दे. त्याच्या ज्योतीने आम्ही ‘ज्योत से ज्योत जगाओ…’ ही सद्गुरूंची आरती म्हणतांना ‘आमच्यातील आत्मज्योत भक्तीभावाने प्रज्वलित व्हावी’, यासाठी तुम्हाला आर्ततेने आळवतो.
२. देवाने व्यापक स्तरावर, म्हणजे गुरुसेवेतील सर्वच वस्तूंविषयी भाव अनुभवण्यास देणे
यानंतर देवाने मला व्यापक बनवत गुरुसेवेत सहभागी असणार्या सर्वच वस्तूंविषयी असा भाव अनुभवण्यास दिला, उदा. स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडी आणि यंत्रे, भोजनकक्षातील पटल अन् आसंद्या, चिकित्सालयातील औषधे, ‘सोशल मीडिया’ (सामाजिक प्रसारमाध्यमे) सेवेमध्ये सहभागी होणारी यंत्रे, म्हणजे भ्रमणभाष, भ्रमणसंगणक इत्यादी. त्याबद्दल श्री चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– श्री गुरुचरण सेविका,
वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.३.२०२१)
बुद्धीअगम्य प्रयोगपुढील २ सूत्रे प्रत्येकी तीन वेळा वाचा आणि तेव्हा ‘काय अनुभूती येते ?’, हे अनुभवा. त्या अनुभूती sankalak.goa@gmail.com या पत्त्यावर २ -३ दिवसांत कळवा, म्हणजे त्यामागील शास्त्रासह त्या लवकर छापता येतील. १. ‘हे देवा, तुम्ही या जिवाला सर्वच वस्तूंचे महत्त्व लक्षात आणून देऊन त्यांच्यातील भाव अनुभवण्याची संधी दिली आणि ही सुंदर अनुभूती देऊन त्यातून पुष्कळ आनंदही दिला’, त्याबद्दल आपल्या श्री चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’ – श्री गुरुचरण सेविका, २. ‘एखाद्या व्यक्तीने थोडे जरी साहाय्य केले, तरी आपण तिचे आभार मानतो. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात कितीतरी वस्तू आपल्याला साहाय्य करतात; म्हणून त्यांचेही आभार मानले पाहिजेत’, हे वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांच्या लेखामुळे लक्षात आले. त्याबद्दल त्यांचेही आभार !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२८.२.२०२३) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |