अवगुणांची होळी करूया !

हिंदु संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक सणाला ‘अध्यात्मशास्त्रीय’ महत्त्व आहे. अशा महान हिंदु संस्कृतीला पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण कुठे तरी विसरत चाललो आहोत. त्यामुळे सणांचे पाश्चात्त्यीकरणासमवेत बाजारीकरणही होत आहे. सणांमुळे मानवाला आध्यात्मिक चैतन्याचा लाभ होतो आणि आत्मशांतीही लाभते. हा सण साजरे करण्याचा मुख्य उद्देश विसरल्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे.

होळी आणि धूलिवंदन यांसारख्या पवित्र सणांच्या वेळीही गैरप्रकार सर्रास पहायला मिळतात. ‘डीजे’चा कार्यक्रम आयोजित करणे, त्यात मद्याच्या मेजवान्या करणे, असे प्रकार मोठ्या शहरांमध्ये सर्रास होत आहेत. हिंदु धर्मात अशा प्रकारे सण साजरी करण्याची पद्धत कुठेच सांगितली गेली नाही; परंतु हिंदूच हिंदु धर्मातील काही सण विकृत पद्धतीने साजरे करत असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु सणांवर नाहक टीका करतात. यामुळे अयोग्य पद्धतीने सण साजरे करणारेही हिंदूच आणि टीका करणारेही हिंदूच ! हे दुर्दैवी आहे.

होळी साजरी करतांना आपल्यातील रज-तम प्रधान दोष होळीमध्ये समर्पित करणे आणि सत्त्वप्रधान होळीचे चैतन्य पूजकाने ग्रहण करणे, तसेच दृष्ट प्रवृत्ती अन् अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे ‘होलिकोत्सव.’ ‘वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे’, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. त्यानंतर येणार्‍या धूलिवंदनाच्या दिवशी साक्षात् भगवान श्रीकृष्ण ‘आपल्याला प्रेमाचा, ज्ञानाचा रंग लावत आहे’, हा भाव ठेवावा. प्रत्येक रंग हा त्याच्या विशिष्ट गुणांनी ओळखला जातो. केशरी रंग ‘त्यागा’चा, पांढरा ‘शांती’चा, निळा ‘भावा’चा, पिवळा ‘चैतन्या’चा, हिरवा ‘समृद्धी’चा, तर लाल रंग ‘लढाऊवृत्ती’चा आहे. अशा अनेक गुणांनी स्वत:ला भारीत व्हायला धूलिवंदन हा सण शिकवतो. हे फक्त सद्गुणरूपी ईश्वराला शरण गेल्यावरच शक्य आहे.

होळीत जाळण्यासाठी लाकडे, गोवर्‍या चोरणे; बळजोरीने वर्गणी मागणे, धूलिवंदनाच्या दिवशी रंग फासणे इत्यादी गैरप्रकार हे दखलपात्र अपराध आहेत. असे अनुचित प्रकार होणार्‍या संभाव्य ठिकाणांची नावे पोलिसांना कळवू शकतो. हिंदु धर्मातील प्रत्येक सण पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. त्यामुळे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन सणांमध्ये शिरलेले अपप्रकार रोखण्यासाठी पुढे यायला हवे !

– श्री. जयेश बोरसे, पुणे