मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात ‘ड्रोन’ उडवण्यास बंदी !
‘महिला प्रीमियर लीग २०२३’
मुंबई – येथे ४ मार्चपासून ‘महिला प्रीमियर लीग २०२३’चे क्रिकेटचे सामने चालू झाले आहेत. त्यातील काही सामने चर्चगेटजवळील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यांच्या वेळी स्टेडियम परिसरात ड्रोन, छोटे विमान किंवा इतर कोणतीही वस्तू उडवण्यास मुंबई पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटार, हँग ग्लाइडर्स, यूएव्ही, यू.ए.एस्., मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोट पायलट एअरक्राप्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एअरक्राफ्ट यांसारख्या हवाई उड्डाणाला अनुमती दिलेली नाही.
महिला प्रीमियर लीगच्या निमित्ताने तेथे अतीमहत्त्वाच्या व्यक्ती, मोठे अधिकारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. आतंकवादी किंवा समाजविरोधी घटक हवाई मार्गाचा वापर करून हल्ला करू शकतात. त्यामुळे ५, ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २१ आणि २६ मार्च या दिवसांमध्ये वरील स्वरूपाचा प्रतिबंध करण्यात आला आहे. या नियमांचा भंग करणार्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिली आहे.