आयुर्वेदोक्त दंतधावन (दात घासणे) कसे करावे ?

आयुर्वेदोक्त दंतधावन

‘वसंतऋतूचे आगमन झाले आहे. या काळात कफ विकार नैसर्गिकरित्या होतात; पण त्याचा त्रास होऊ नये म्हणून किमान या काळात तरी आयुर्वेदोक्त दंतधावन करायला हवे. खरेतर आयुर्वेदोक्त दिनचर्येमध्ये याचे वर्णन असल्याने प्रतिदिनच या पद्धतीने दंतधावन करणे अपेक्षित आहे.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

सकाळी उठून शौच विधी झाल्यावर रुईच्या झाडाची एक कोवळी फांदी घ्यावी. तिची सर्व पाने काढावीत; मात्र हे करतांना रुईचा चिक डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याने फांदी स्वच्छ धुवून घ्यावी. त्या फांदीचे लहान देठ तोंडात घेऊन सर्व बाजूंनी व्यवस्थित चावावे; मात्र कडू, तिखट आणि तुरट असा तिचा रस अन् त्यासह तोंडातील कफ न गिळता तो थुंकून टाकावा अन् पाण्याने तोंड धुवावे.

अशा प्रकारे केवळ रुईचीच फांदी नव्हे, तर वड किंवा कडूनिंब यांच्या कोवळ्या फांदीनेही याप्रमाणेच दंतधावन करता येते. आपल्याकडे ‘पेस्ट’ येण्यापूर्वी अशाच प्रकारे दात घासून त्यांचे आरोग्य सांभाळले गेले आहे. ज्यांना मळमळते, उलटी होते, दम्याचा त्रास, तोंडात जखम झाली आहे आणि ताप आहे अशांनी या प्रकारे दंतधावन करू नये.’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२४.२.२०२३)

(ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)