देशासाठी कार्य करणे, ही समाजऋण फेडण्याची संधी ! – अप्पासाहेब धर्माधिकारी
‘रायगड भूषण’ श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना ‘डी.लिट.’ पदवी प्रदान !
नवी मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – देशाने मला काय दिले, यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो, असा विचार करून कार्य करणे, ही आपल्याला समाजऋण फेडण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वाशी येथे केले. सामाजिक कार्यातील योगदानाविषयी ‘रायगड भूषण’ श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने ‘डी.लिट.’ पदवी ५ मार्च या दिवशी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात प्रदान करण्यात आली. या वेळी अप्पासाहेब धर्माधिकारी बोलत होते.
अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना ही पदवी दिली आहे. यातून त्यांना आणखी काम करायला प्रोत्साहन मिळणार आहे.
श्री. सचिनदादा धर्माधिकारी म्हणाले की, या पदवीमुळे प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव वाढला आहे. हा माझा एकट्याचा नव्हे, तर या कार्याचा सन्मान आहे. देशाने मला काय दिले ? यापेक्षा मी देशासाठी काय केले ? असा विचार केला पाहिजे.
सौ. स्वरूपावहिनी धर्माधिकारी म्हणाल्या, ‘‘नीतीमूल्यांची जागृती समाजात होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशक्य ते शक्य होणार आहे. आपल्याला हा नरदेह सत्कर्म करण्यासाठी मिळाला आहे. आपण नीतीमूल्ये अंगीकारली, तर ती पुढच्या पिढीत येणार आहेत.’’
जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापिठाचे विशाल टिब्रेवाल म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सदस्यांनी घेतलेले श्रम पाहून देवत्वाची प्रचीती येते. आपल्या मनात विश्वास असेल, तर अशक्य ते शक्य होते, हे यातून अनुभवले आहे.’’
या वेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार पूनम महाजन, श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.