भारताची जाणीवपूर्वक अपकीर्ती ?
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे भारताच्या विरोधात अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार आयोग, आयटीयू (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन), जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांची कार्यालये असलेल्या प्रसिद्ध चौकातच हे भारतविरोधी फलक अगदी नीट लक्षात येतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत. या फलकांवरील लिखाण काय आहे ? तर ‘भारतातील महिलांना गुलामासारखी वागणूक मिळते’, ‘बालविवाह – लहान मुलांच्या अधिकारांचे भारतात गंभीररित्या हनन होते’, ‘भारतातील ख्रिस्त्यांना राज्यपुरस्कृत आतंकवादाला सामोरे जावे लागते’, ‘भारताने धार्मिक कडवेपणा बंद करावा’, ‘भारतात अल्पसंख्यांकांवर आतंकवादी आक्रमणे होतात’, अशा स्वरूपाचे अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे शिकणार्या एका भारतीय मुलीने या फलकांचे ध्वनीचित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्यावर हे उघड झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, एवढ्या उघडपणे असा खोटेपणा कुणी कसा करू शकतो ? तसेच त्याला रोखण्याचा कुणीच प्रयत्न का करत नाही ?
भारतविरोधाचे ‘टूलकीट’ !
सध्या जागतिक पातळीवर वजनदार देश बनलेल्या भारतात ‘जी २०’ देशांच्या बैठका चालू आहेत. या बैठकांचे आयोजन भारताने चांगल्या प्रकारे केले आहे. ‘अनेक प्रश्नांना भारताने न्याय दिला आहे. जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वाचे प्रश्न भारत पुढाकार घेऊन सोडवू शकतो’, असा विश्वास जागतिक स्तरावरील नेत्यांनी व्यक्त केला आहे. एका अर्थाने भारताचे नेतृत्व जगातील २० शक्तीशाली देशांनी मान्य केले आहे. ‘जी २०’मध्ये सहभागी देश जागतिक अर्थव्यवस्थेतील ९० टक्के वाटा उचलतात, तर जागतिक स्तरावरील ८० टक्के व्यापार या देशांमध्ये होतो. यावरून भारताच्या शक्तीची कल्पना येते. असे असूनही संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयासमोरच असे फलक लागणे, यामागे कुणाचे षड्यंत्र आहे ? याचा शोध घेणे आवश्यक आहे. या फलकावरील एकेका लिखाणाचा विचार केला, तर कशा प्रकारे पद्धतशीरपणे भारताची अपकीर्ती करून जागतिक समुदायासमोर, जागतिक प्रतिनिधींपुढे भारतविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे, हे स्पष्ट दिसते. भारतात सध्या नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रवादी सरकार सत्तेत आहे. पूर्वी काँग्रेसच्या राजवटीत एक भारतविरोधी अब्जाधीश व्यक्ती जॉर्ज सोरोस भारतातील अनेक हिंदु आणि भारतविरोधी संस्था यांना पैसे पुरवून येथील व्यवस्था खिळखिळी करायचे, येथील काही व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून आणि आर्थिक अपव्यवहार करून पैसे कमवायचे. मोदी सरकारने परदेशी निधीच्या संदर्भात कायदा आणल्यामुळे हे नसते उद्योग सोरोस यांना करता येत नाहीत. सोरोस यांना पैसे खर्च करून अन्य देशांच्या राजकारणावर प्रभाव पाडून त्यांचे म्हणणे ऐकतील, अशी माणसे निवडून आणण्याची कला अवगत आहे. पैसे फेकून स्वत:ला हवे तसे एखाद्या देशात घडवून आणणारी सोरोस यांच्यासारखी मंडळीच भारतविरोधी षड्यंत्राचे सूत्रधार असू शकतात. याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी ग्रेटा थनबर्ग या तथाकथित पर्यावरणवादी मुलीकडून भारतातील शेतकरी आंदोलनाच्या वेळी भारतात सरकारविरोधी विविध घडामोडी करण्याचा कार्यक्रम तिच्या टूलकीटद्वारे उघड झाला होता. तोच भाग स्वित्झर्लंड येथेही कुणी करत आहे का ? याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
साहाय्याची अशी परतफेड
भारताने भूकंपाच्या वेळी साहाय्य केलेल्या तुर्कीये देशाने संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरविरोधी सूर आळवला. जगातील इस्लामी देशांची संघटना भारताशी चांगले संबंध आहेत, हे स्वीकारते आणि पुन्हा काश्मीरविरोधी भूमिका घेते. यावरून भारताची केवळ दाखवण्यापुरतीच स्तुती केली जात आहे, हे भारतीय शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे. भारताने साहाय्याची शक्ती दाखवली आहे. आता कणखर भूमिका घेऊन सैन्य शक्तीही जेथे आवश्यक आहे, तिथे दाखवली पाहिजे. अन्यथा कुणीही सोम्या-गोम्या भारतविरोधी काहीही बरळेल !
खलिस्तान्यांना चिरडा
खलिस्तानवादी गुरुपंतवंतसिंह पन्नू कॅनडात बसून ‘भारतातील पंजाब आणि हरियाणा ही राज्ये भारताचा भाग नाहीत. भारताच्या गृहमंत्र्यांची हत्या करू’, अशी उघड विधाने करू शकतो. तेथे बसून भारतातील एका पोलीस चौकीवर त्याच्या गुंडांकरवी आक्रमण करू शकतो. हे भारताच्या सामर्थ्याला जुमानत नसल्याचे लक्षण आहे. इस्रायल जगाच्या नकाशात दिसतही नाही एवढासा देश आहे; मात्र त्याच्या आक्रमकतेचा जगात बोलबाला आहे. इस्रायल जेव्हा त्याच्या शत्रूराष्ट्रांवर आक्रमण करतो, तेव्हा अमेरिकाही त्याला काही बोलण्याचे धाडस करत नाही. जगातील कुणाच्या मतांना, बोलण्याला भीक न घालता इस्रायल त्याच्या शत्रूंना नष्ट करतो. अमेरिकाही तेच करते. असे असतांना भारत मागे का रहातो ?
काँग्रेसी बालबुद्धीला आवरा !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे हास्यास्पद आणि स्वत:ची वैचारिक उंची (?) स्पष्ट करणारे विधान परदेशात केले आहे. केंब्रिज विद्यापिठात विद्यार्थ्यांपुढे बोलतांना ते म्हणाले की, ‘मी काश्मीरमध्ये गेलो असतांना आतंकवाद्याला पाहिले. त्यानेही मला पाहिले; मात्र काही केले नाही.’ याविषयी ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विवेक ग्निहोत्री यांनी राहुल यांना चांगलेच सुनावले आहे. भारताने देशातील अशा वेडगळांना आवरण्यासह जागतिक स्तरावर कणखर, कठोर आणि आक्रमक भूमिका घेणे आणि त्यानुसार आवश्यक तेथे कृती करणे, ही काळाची आवश्यकता आहे.