अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवण्यास देऊ नये ! – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
सांगली – अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची अनुमती देऊ नये, अशा प्रकारचे प्रबोधन गेले दोन मास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथील अधिकारी वेगवगळ्या शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये जाऊन करत आहेत. असे असूनही सदर प्रकारांमध्ये घट झाल्याचे दिसून येत नाही. तरी अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवण्यास देऊ नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायूवेग पथकाने धडक मोहीम चालू केली असून एकूण २० अल्पवयीन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून १२ वाहने जप्त केली आहेत.
१६ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला, तर सदर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणार्या मुलाच्या पालकांना ३ वर्षे कारावास आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली आहे.