(म्हणे) ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा !’ – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
|
नाशिक – होळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा’, असे आवाहन जनतेला केले आहे. यामध्ये पुरणपोळी किंवा खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे, असे सांगण्यात आले आहे. होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटुंबे, तसेच अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम येथे वाटप केले जाईल.
पाण्याविना रंगपंचमी खेळण्याचे आवाहन !
‘होळीसाठी लाकूड आणि गोवर्या जाळू नयेत. रंगपंचमीला पाणी आणि रासायनिक रंगांऐवजी फक्त वनस्पती रंग वापरून पाण्याविना रंगपंचमी खेळावी’, असेही आवाहन अंनिसने केले आहे. (अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी त्यांच्याकडून होणार्या प्रदूषणाविषयी ‘ब्र’ही न काढणारी अंनिस हिंदूंचे सण आले की, लगेच पर्यावरणपूरक भूमिका घेते, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहोळीमध्ये अग्निदेवतेला अर्पण करायची पोळी गरिबांना वाटायला सांगणार्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला गोरगरिबांना पोळ्या वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे जमा करून का वाटत नाही ? हिंदूंच्या सणांच्या आयत्या ‘पिठा’वर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ का मारता ? |