सिंधुदुर्ग : तिलारी खोर्यातील हत्ती हटवा, अन्यथा त्यांना गोळ्या घालण्याची अनुमती द्या !
|
दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी खोर्यात गेली २२ वर्षे हत्तींचा उपद्रव चालू आहे. यामुळे शेती, बागायती यांची अपरिमित हानी झाली आहे. हत्तींची समस्या सोडवण्यासाठी शासनाने केलेल्या सर्व उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे आता हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा किंवा हत्तींना गोळ्या घालण्याची अनुमती शेतकर्यांना द्यावी, अशी संतप्त मागणी हानीग्रस्त गावांतील सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी सरकारकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ३१ मार्चपर्यंत ठोस कार्यवाही न केल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी या वेळी दिली.
तळकोकणातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुडगूस; केळी, काजू, नारळ, पोफळीच्या बागांचं मोठं नुकसान https://t.co/ZdfGukvx6U #kokannews
— ABP माझा (@abpmajhatv) January 18, 2023
दोडामार्ग येथील ‘स्नेह रेसिडन्सी’मध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस, मोर्लेच्या सरपंच संजना धुमास्कर, उपसरपंच संतोष मोर्ये, हेवाळेच्या सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, घोटगेवाडी उपसरपंच सागर कर्पे, माजी सरपंच प्रेमनाथ गवस, मांगेली उपसरपंच कृष्णा गवस आदी उपस्थित होते.
‘हत्तींचा वावर वाढल्यामुळे शेती, बागायती येथे जाणे धोक्याचे झाले आहे. हत्तींमुळे झालेल्या हानीची मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे आणि त्यासाठीचे निकषही क्लिष्ट आहेत. त्यामुळे आता आम्हाला भरपाई वगैरे काही नको’, अशी मागणी मान्यवरांनी पत्रकार परिषदेत केली.
सरपंच गोपाळ गवस म्हणाले, ‘‘शासनाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खासगी अभयारण्यासाठी शासन प्रक्रियेनुसार ७ हत्ती दिले. त्याचप्रमाणे तिलारी खोर्यातील हत्तींचा निर्णय घ्यावा. हत्ती गावातील लोकवस्तीपर्यंत येतात. जीव धोक्यात घालून स्थानिक ग्रामस्थ त्यांना हुसकावून लावतात. वनविभागाचे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. हत्ती हटवण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला; मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. कष्ट करून उभी केलेली बागायती हत्तींकडून क्षणार्धात नष्ट केली जाते. हत्ती हटवण्यासाठी शासनाने ठोस भूमिका न घेतल्यास स्थानिकांमधून तीव्र पडसाद उमटतील.’’
संपादकीय भूमिकाहत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन आतंकवाद्यांकडून जनतेचे रक्षण काय करणार ? |