गोव्यात २४ घंट्यांत आगीसंबंधी ७९ घटना
पणजी, ४ मार्च (वार्ता.) – राज्यातील अग्नीशमन दलाने २४ घंट्यांत आगीच्या दुर्घटनेसंबंधी एकूण ७९ घटना हाताळल्या आहेत. ३६ घंट्यांमध्ये आगीसंबंधी १०० घटनांची नोंद झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांत आकस्मिकरित्या तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी गवताला आग लागणे किंवा काजूच्या बागायतीला आग लागणे, अशा घटना घडल्या आहेत. राज्यात नोंद झालेल्या एकूण ७९ घटनांपैकी ७० घटना या गवत किंवा बागायती यांना आग लागण्यासंबंधी होत्या, तर उर्वरित ९ घटना या अन्य स्वरूपाच्या होत्या. आगीच्या सर्वाधिक घटना या मडगाव, फोंडा, डिचोली, म्हापसा आणि पेडणे येथे घडल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली आहे. अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आगीच्या अनेक घटना घडल्याने ठिकठिकाणी आग विझवण्यासाठी पाण्याचे बंब अल्प पडले.
Goa Fire News : आगीचा भडका; 24 तासांत अग्निशामक दलाला 79 कॉल#Goafire #Firenews #Goanews #Dainikgomantak https://t.co/aeRvLrsmKu
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) March 5, 2023
कुडतरी येथील सेंट अँथनी कपेलजवळ एका दुर्घटनेत २ चारचाकी वाहनांना आग लागून सुमारे १३ लाख रुपयांची हानी झाली. ४ मार्च या दिवशी सकाळी ५.४५ वाजता ही दुर्घटना घडली. अज्ञातांनी हा घातपात केल्याची चर्चा गावात चालू आहे. कोलवा येथे एका ठिकाणी आग लागून घर खाक झाले. या आगीमध्ये सुमारे २० लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमध्ये घरातील सर्व वस्तूंची राख झाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.