गोव्यातील पाकधार्जिण्यांवर कारवाई करा !
म्हापसा येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी
म्हापसा, ४ मार्च – गोव्यातील पाकिस्तानधार्जिण्या मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी म्हापसा येथील नगरपालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ४ मार्च या दिवशी सायंकाळी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनाला प्रार्थना आणि श्लोक म्हणून प्रारंभ झाला. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा उद्देश सांगितला. यानंतर उपस्थित हिंदुत्वनिष्ठ वक्त्यांनी आंदोलनाला संबोधित केले. वक्त्यांच्या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला.
शांत, सभ्य आणि धार्मिक सलोखा टिकून असलेले राज्य अशी गोव्याची जगभरात ओळख आहे; मात्र काही धर्मांध व्यक्ती व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने गोव्यात वास्तव्य करून येथील धार्मिक सलोखा बिघडवू पहात आहेत, तसेच पाकिस्तानधार्जिणेपणा दाखवून येथील आंतरिक सुरक्षेला धोका पोचवत आहेत. याचा प्रत्यय देणार्या अनेक घटना गोव्यात घडत आहेत. कळंगुट येथे एका धर्मांध व्यापार्याने पाकिस्तानला समर्थन करत असल्याचे धक्कादायक विधान केले. बोर्डा, मडगाव येथील एका विद्यालयात ‘पी.एफ्.आय.’ या बंदी घातलेल्या संघटनेच्या कारवायांमुळे प्रभावित होऊन काही धर्मांध विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि शिक्षकांच्या वाहनाची मोडतोड केली. श्री रामेश्वर देवस्थान, पर्वरी येथे एका धर्मांधाने वाहन मंदिर परिसरात नेल्याविषयी विचारल्यानंतर गैरवर्तणूक केली आणि नंतर सार्वजनिक ठिकाणी मोठा सुरा हातात घेऊन दहशत निर्माण केली. ‘पी.एफ्.आय.’चा सदस्य अल्ताफ सय्यद याच्यासह ११ जणांना अपहरण प्रकरणी बांबोळी येथे अटक करण्यात आली. या गोव्यात हल्लीच घडलेल्या घटना आहेत.
याप्रसंगी भारतामध्ये पाकिस्तानचे गोडवे गाणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून कारवाई करणे आणि उपरोल्लेखित सर्व घटनांमध्ये बंदी घातलेल्या ‘पी.एफ्.आय.’चा हात आहे का ? याचे अन्वेषण करून ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. युवराज गावकर यांनी केले, तर हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले.
आंदोलनाला डिचोली येथील धर्माभिमानी सौ. सोनम शिरोडकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर आणि पेडणे येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवप्रसाद जोशी यांनी संबोधित केले.