छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र असेल ! – सद्गुरु स्वाती खाडये
|
मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग), ४ मार्च (वार्ता.) – हिंदूंना नामशेष करण्यासाठी चारही बाजूंनी आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतर, असे प्रकार होत आहेत. आपण आताच सिद्ध झालो नाही, तर गोमाता चित्रात दाखवावी लागेल. बहुसंख्य हिंदूंच्या भारतात प्रतिवर्षी १५ लाख हिंदू धर्मांतरित होत आहेत. अशीच स्थिती राहिली, तर आपण अल्पसंख्य होऊ. असे झाले, तर हिंदु म्हणून जगणे कठीण होईल. स्वत:चे अस्तित्व टिकवायचे असेल, तर धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या.
सभेच्या प्रारंभी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये अन् हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून सभेला प्रारंभ झाला. सभेच्या प्रचारकार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सभेच्या यशस्वीतेसाठी साहाय्य करणार्यांचे या वेळी आभार मानण्यात आले.
हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि तो आम्ही मिळवणारच !
आज भारत देश आणि हिंदु धर्म यांवर विविध आक्रमणे होत आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड कायदा, भूमी जिहाद यांसह हलाल जिहादचे संकट देशावर घोंगावत आहे. हिंदू अल्पसंख्य झाले, तर या देशाचे भवितव्य गंभीर आहे. त्यामुळे देशात हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी पद, पक्ष, संघटना, आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून संघटित व्हा. ‘हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच’, असे राष्ट्र आणि धर्म द्रोही यांना ठणकावून सांगा, असे आवाहन मान्यवर वक्त्यांनी वायंगणी येथे झालेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
राज्यघटनेद्वारेच होणारा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ? – सद्गुरु स्वाती खाडये
हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडतात; कारण त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही. शाळांतून हिंदूंना धर्मशिक्षण देऊ शकत नाही. मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?
अंनिसच्या कार्यक्रमासाठी अनुमती देणार्या अधिकार्यावर कारवाईसाठी प्रयत्न करणार ! – मनोज खाडये
• सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने वैज्ञानिक जाणिवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१६ या अन्वये शाळांमध्ये व्याख्याने आयोजित केली होती. या माध्यमातून हिंदु धर्मावर चिखलफेक करून मुलांचे मन कलुषित करायचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर आम्ही चेतावणी दिली. त्यानंतर प्रशासनाने दिलेली अनुमती रहित केली. ज्या अधिकार्याने या कार्यक्रमाची अनुमती कोणताही विचार न करता दिली, त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे करणार आहोत.
• अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव हे ग्रामस्थांची श्रद्धा असलेल्या आचरा गावच्या गावपळणीलाही विरोध करण्यासाठी यापूर्वी गावात आले होते; मात्र संतप्त ग्रामस्थांपुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांना येथून पळ काढावा लागला होता. (गावपळण म्हणजे गावातील लोकांनी गावाच्या बाहेर जाऊन रहाणे)
• सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री समर्थ संप्रदायांच्या मोठ्या प्रमाणात बैठका चालतात. या संप्रदायांचे प्रमुख पू. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले. ब्रिगेडी संघटनेने त्याला विरोध करून हा सन्मान रहित करण्याची मागणी केली. भक्त म्हणून आपण संतांच्या अवमानाचा परामर्श घेतला पाहिजे.
कोकणातील मंदिरांच्या भूमींचे रक्षण करण्याचे दायित्व हिंदूंनी घेतले पाहिजे ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
आज देशात अल्पसंख्य संघटित असून त्यांच्या संघटनाच्या प्रभावामुळे राजकीय शक्तीही अन्यायग्रस्त हिंदूंची बाजू ऐकून घेत नाहीत. त्यामुळे हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. आजची पुरोगामी मंडळी यापूर्वीच्या युगात नव्हती, अन्यथा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोर्चे, पुरस्कार परत करणे इत्यादी केले असते. हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाच्या कायद्यावर बोट ठेवले जाते; मात्र प्रतिदिन मशिदींतून होणार्या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. अशी पक्षपाती व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष राज्याचीच देणगी आहे.
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जाते. सरकारीकरण झालेल्या मंदिरातही भ्रष्टाचार होत आहे; परंतु मशिदी अथवा चर्च यांचे सरकारीकरण केले जात नाही, हे लक्षात घ्या. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. देवीची मूर्ती नाजूक स्थितीत आहे. अशी स्थिती असल्याने आता मंदिरे भक्तांच्या कह्यात घेतली पाहिजेत. कोकणातील मंदिरांच्या शेकडो एकर भूमींचे रक्षण करण्याचे दायित्व आपण घेतले पाहिजे.
सभेच्या विरोधात पोलिसांना ‘ई-मेल’ !सभेला होणार्या विरोधाविषयी अधिवक्ता सांगोलकर म्हणाले, ‘‘आचरा पोलिसांना कुणीतरी ‘ई-मेल’ पाठवून ‘या सभेमुळे धार्मिक तेढ निर्माण होईल’, असा कांगावा केला आहे. गेल्या १४ वर्षांत असे कधीच झाले नाही. या व्यासपिठावरून हिंदु धर्मावर होत असलेल्या आघातांची वस्तूस्थिती मांडली जाते.’’ |
वायंगणी, मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील क्षणचित्रे
१. वायंगणी येथील वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांच्या ‘गुरुकुल वेदपाठशाळे’च्या ब्रह्मवृंदांनी वेदमंत्रपठण केले. सभेच्या वेळी सत्कार करण्यात आला. या वेदपाठशाळेतील १५ विद्यार्थी सभेला आवर्जून उपस्थित होते.
२. हडी गावातील ‘बोलेरो पिकअप’च्या चालकाने वाहनाला भगवा ध्वज बांधून आणि ध्वनीवर्धक लावून गावातील लोकांना सभेला उपस्थित रहाण्यासाठी उद्युक्त केले. काही धर्मप्रेमींना त्यांनी वाहनातून सभास्थळी आणले.
संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार
१. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष धर्मप्रेमी श्री. वामन आचरेकर यांनी केला. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान वायंगणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अधिवक्त्या समृद्धी आसोलकर यांनी केला.
२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचा सत्कार आचरा येथील व्यावसायिक श्री. अशोक पवार यांनी केला. अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांचा सत्कार आचरा येथील श्री. मंदार सरजोशी यांनी केला.
धर्मप्रेमींचा सत्कार
१. सभा यशस्वी होण्यासाठी आणि सभेचा व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी प्रयत्न करणारे धर्माभिमानी सर्वश्री मंदार सरजोशी, प्रफुल्ल नलावडे, सिद्धार्थ कोलगे, विवेक परब, समीर बावकर, गणेश आचरेकर, नित्यानंद परब, मंदार सांबारी, अविनाश परब, विद्यानंद परब, रोहित भिरवंडेकर, चंदू कदम, गणेश गोगटे, रवि बागवे, अविराज परब, रूपेश बागवे या धर्मप्रेमींचा, तसेच धर्मप्रेमी श्री. सीताराम उपाख्य भाऊ चोडणेकर यांचा सत्कार श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आला.
२. ज्ञानदीप संस्था वायंगणी (तालुका मालवण) संचलित ‘ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय’ आणि ‘श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी’ यांचे अध्यक्ष श्री. सदानंद राणे यांचा सत्कार श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आला.
३. धर्मप्रेमी सौ. दुर्गा पडवळ आणि सौ. दक्षता सुर्वे यांचा सत्कार सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते करण्यात आला.
सभेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणार्यांचे आभार
१. ज्ञानदीप संस्था वायंगणी यांनी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे पटांगण, पटले, आसंद्या आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले.
२. मालवण येथील ‘हिंदमाता डेकोरेटर्स’चे मालक श्री. अभिमन्यू पांचाळ यांनी व्यासपीठ उभारणीसाठीचे साहित्य, विद्युत जनित्र, तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून दिले.
३. सभेची पूर्वसिद्धता करणार्या कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था, तसेच भोजन आणि न्याहारी यांसाठी लागणारे साहित्य धर्मप्रेमींनी उपलब्ध करून दिले.
४. श्री. महेश मेस्त्री (वायंगणी) यांनी ध्वनीवर्धक व्यवस्था उपलब्ध करून दिली.
५. आचरा पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी, विविध माध्यमांचे पत्रकार यांच्यासह सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे या वेळी आभार मानण्यात आले.
६. वायंगणी आणि आचरा दशक्रोशीतील सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच यांनी सभेच्या प्रसारासाठी सहकार्य केल्याविषयी आभार व्यक्त करण्यात आले.
१५ मार्चला आचरा येथे महाआंदोलन !
१५ मार्च या दिवशी आचरा तिठा येथे समितीच्या माध्यमातून महाआंदोलन घेणार येणार आहे, त्यात सर्वजण उपस्थित सहभागी होणार ना ?, असा प्रश्न श्री. खाडये यांनी विचारल्यावर धर्मप्रेमी हिंदूंनी ‘मोबाईल टॉर्च’ चालू करून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.