घाऊक बाजारातील भाजीपाल्याच्या दरात घसरण !

सर्वसामान्यांना दिलासा

नवी मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारातील भाजीपालाच्या दरात घसरण झाली आहे. आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर न्यून झालेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

घाऊक बाजारात अनेक भाज्या १० ते २० रुपये किलो, तर काही भाज्या २० ते ३० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर ३० ते ४० आणि ५० ते ६० रुपये किलो झाले आहेत. टोमॅटो आणि वाटाणा ३० रुपये किलोने मिळत आहे.

मुंबईच्या बाजारात पुणे, नाशिक, नगर, सोलापूर आदी भागांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे. तसेच कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथूनही भाज्या बाजारात येत आहेत. या वर्षी पिकांसाठी चांगले पोषक वातावरण असल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही चांगले झाले आहे. यामुळे स्थानिक बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. परिणामी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. सध्या घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांच्या सरासरी ६५० गाड्यांची आवक होत आहे.