ग्रंथालय चालक आणि मालक यांनी मनापासून ग्रंथालय चालवण्याचा प्रयत्न करावा ! – दत्तात्रेय क्षीरसागर, ग्रंथालय संचालक
सोलापूर, ४ मार्च (वार्ता.) – ग्रंथालय कर्मचारी आणि चालक यांनी मनापासून ग्रंथालय चालवण्याचा प्रयत्न केला, तर वाचन संस्कृती अन् वाचन चळवळ कधीच धोक्यात येणार नाही, असे प्रतिपादन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशन प्रसंगी ‘नवीन युगातील ग्रंथालयांची वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, प्राध्यापक हरिदास रणदिवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, कवयित्री वंदना कुलकर्णी, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, निरिक्षक प्रमोद पाटील, माजी कृषी आयुक्त आबासाहेब साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह साहेबराव शिंदे, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, जयंत आराध्ये, संचालक भास्कर कुंभार आणि प्रदीप गाडे आदींसह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक पवार यांनी केले.
किल्लेदार सभागृहात झालेल्या अधिवेशनात बहुसंख्येने वाचक, ग्रंथालय कर्मचारी आणि चालक उपस्थित होते. पुढे क्षीरसागर म्हणाले की, ग्रंथालय कर्मचारी आणि चालक यांच्या अडचणींची मला जाण आहे. आपण आपल्या हक्काची मागणी करत असतांना कर्तव्यात कसूर होणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. राज्यातील ग्रंथालय सक्षमपणे उभे करण्यासाठी आणि स्वत:च्या मागण्या शासनाकडून ९९ टक्के पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
मंगळवेढा येथील स्वर्गीय संजय सविता सार्वजनिक वाचनालय आवर्जून पहावे ! – दत्तात्रेय क्षीरसागरआपले वाचनालय आदर्श बनवण्यासाठी मंगळवेढा येथील स्वर्गीय संजय सविता सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय कर्मचारी आणि चालक यांनी ते आवर्जून पहावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले. |