आध्यात्मिक स्तरावर परिपक्व आणि कौतुकास्पद उत्तरे देणारा वाराणसी आश्रमातील कु. सौम्येंद्र सिंह (वय १७ वर्षे) !

‘मागील ४ वर्षांपासून प्रयाग येथील किशोरवयीन साधक कु. सौम्येंद्र सिंह (वय १७ वर्षे) वाराणसी आश्रमामध्ये पूर्णवेळ साधना करत आहे. पूर्वी बिहार येथील एक बालसाधक वाराणसी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होता. काही वर्षांनी त्याच्या मनात घरी राहून शिक्षण घेण्याचा विचार आला आणि तो घरी गेला. घरी गेलेल्या बालसाधकाने सौम्येंद्रला भ्रमणभाषवर संपर्क केला होता. त्या वेळी त्या दोघांमध्ये झालेले संभाषण पुढे दिले आहे. सौम्येंद्रच्या वयाच्या तुलनेत त्याने दिलेली उत्तरे परिपक्व आणि कौतुकास्पद आहे.

– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, वाराणसी आश्रम

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

 १. हिंदु राष्ट्रात संत म्हणजे, ‘साक्षात् भगवंत’ मार्गदर्शक असल्यामुळे येणारे हिंदु राष्ट्र हे रामराज्यच असेल, याची निश्चिती असणे 

बालसाधक : खरोखर हिंदु राष्ट्र येईल का ? जर आले, तर ते रामराज्याप्रमाणे असेल का ?

सौम्येंद्र : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य असतांना सत्ता आणि व्यवसाय त्यांच्या नियंत्रणात होते. कुणीही मनमानी करू शकत नव्हते. आमच्या हिंदु बहिणी कुठेही निर्भयतेने ये-जा करू शकत होत्या. प्रजाही आपल्या नियमांचे पालन करत होती. हिंदु राष्ट्रही तसेच असेल आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे सरकार नाही, तर ‘संत’ असतील. संत म्हणजे साक्षात् भगवंत ! त्यामुळे ते रामराज्याप्रमाणेच असेल.

कु. सौम्येंद्र सिंह

२. भगवंतावर श्रद्धा असणारे आणि राष्ट्र अन् धर्म यांसाठी काही करू इच्छिणारे लोकच हिंदु राष्ट्रामध्ये असतील !

बालसाधक : हिंदु राष्ट्रामध्ये लोक कसे रहातील ? सर्व लोक रहातील ना कि काही निवडकच लोक असतील ?

सौम्येंद्र : ज्यांच्या मनात ‘समोरील व्यक्तीला मारून त्यांची धन-संपत्ती हडप करूया’, असे विचार असतील, असे लोक हिंदु राष्ट्रामध्ये नसतील. केवळ सकारात्मक लोक असतील. ज्यांची भगवंतावर श्रद्धा असेल आणि जे राष्ट्र अन् धर्म यांच्याप्रती काही करू इच्छितात, असेच लोक हिंदु राष्ट्रामध्ये असतील. हिंदु राष्ट्रामध्ये आताच्या १०० टक्क्यांपैकी केवळ ३० टक्केच लोक असतील.

३. पृथ्वीवर संत आणि दैवी बालके जन्म घेत असून तेच रामराज्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ चालवणार असणे 

बालसाधक : सर्व जण साधनाच करतील, तर देश कसा चालेल ? पुढील पिढीचे काय होईल ? नोटा आणि पैसे, तरी रहातील का ?

सौम्येंद्र : पैशाचा विचार केला, तर हिंदवी स्वराज्य असतांनाही चलनात मुद्रा होत्या. ‘देश कसा चालेल ?’, असा प्रश्न आहे, तर आता आपण पहातो ना ! पृथ्वीवर संत जन्म घेत आहेत. उच्च लोकांतून दैवी बालके जन्म घेत आहेत. पुढे देश तेच चालवतील. त्यांना साधना करण्याची आवश्यकता नाही. ते संतच आहेत. हिंदवी स्वराज्य आणि रामराज्य यांमध्ये सर्व जण साधना करत होते. ते राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती काही करू इच्छित होते, तेव्हा देशाचे कार्य चालू होतेच ना ? तसेच हिंदु राष्ट्र चालेल.

४. आपत्काळात पैसा नाही, तर साधनाच उपयोगी पडणार असणे, साधनेमुळे लोकांचे मनोबल वाढणार असणे आणि लोकांचे रक्षण होणार असल्याने त्यांच्याकडून साधनेच्या मार्गदर्शनाविषयी विचारणा होणार असणे

बालसाधक : आयुष्यात पैसाही आवश्यक असतो आणि साधनेचीही आवश्यकता आहे. त्यामुळे पैसे नसतील, तर जीवन कसे चालेल ?

सौम्येंद्र : पैसा आणि साधना यांचे स्थान स्वतंत्र आहे. जे पुष्कळ पैसे कमवत आहेत, ते आनंदी आहेत का ? आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सुधारण्यासाठी पैसा नाही, तर साधनाच उपयोगी पडणार आहे. साधनेमुळे लोकांचे मनोबल वाढत आहे. प्रथम आपण लोकांना साधना सांगण्यासाठी दूरभाष करायचो. आता लोकांकडून आम्हाला विचारणा होत आहे की, ‘आपत्काळात आमचे रक्षण होण्यासाठी आम्ही कोणती साधना करू ?’

५. आश्रमामध्ये साधनेच्या दृष्टीने चांगले साहाय्य करणारे सहसाधक लाभणे, संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ होऊन साधनेला दिशा मिळणे आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे मन वेगळ्या दिशेने न वहाणे

बालसाधक : तू आश्रमात कसा रहातोस ? तेथे पुष्कळ नियम असतात. तिथे आपण आपल्या मनाने काहीच करू शकत नाही. तेथे कोणतेही स्वातंत्र्य नसते. आपण आपल्या घरी कसेही राहू शकतो. आश्रमामध्ये सर्वकाही विचारून करावे लागते. त्यामुळे बंधनात रहावे लागते.

सौम्येंद्र : घर आणि आश्रम यांमध्ये हेच अंतर (फरक) आहे. घरामध्ये आपण कसेही राहू शकतो; पण आश्रमामध्ये आपण साधनेसाठी आलो आहोत. त्यामुळे प्रत्येक कृती विचारून केल्यानेच आपली साधना होते. मला इथे ईश्वरानेच ठेवले आहे आणि ‘इथे रहाण्यातून मला आनंद मिळतो’, हेच मला ठाऊक आहे. येथे साधनेच्या दृष्टीने चांगले साहाय्य करणारे सहसाधक आहेत, तसेच इथे संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो. त्यातून साधनेला योग्य दिशा मिळते. त्यामुळे मन अयोग्य दिशेने वहावत जात नाही.

६. शिक्षण घेण्यासाठी घरी गेलेल्या मुलाला दळणवळण बंदीमुळे शाळा बंद होऊन ते शिक्षण घेता न येणे आणि हे ईश्वरेच्छेने घडत असल्याचे आश्रमातील साधकाने सांगणे 

बालसाधक : साधनेची आवश्यकता आहे; परंतु त्याचसह शिक्षणाचीही आवश्यकता आहे. पूर्वी मी लहान असल्यामुळे मला साधना चांगली वाटली होती; परंतु आता लक्षात येते की, शिक्षण घेणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे.

सौम्येंद्र : शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिकता येईल, यासाठीच तू घरी गेला होतास ना ? दळणवळण बंदीमुळे हे शक्य होत आहे का ? आता सर्व ईश्वरेच्छेने होत आहे. आपल्या इच्छेने काहीच होत नाही.’

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, वाराणसी आश्रम.(९.६.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक