कोहिनूर हिर्याविषयीचा इतिहास
ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी २४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी पदभार स्वीकारला. त्यानंतर भारतातील राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून इंग्रजांनी भारतातून लुटून नेलेला ‘कोहिनूर’ हिरा भारतात परत आणण्याविषयीची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्या निमित्ताने फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी थोडक्यात विशद केलेला ‘कोहिनूर हिर्या’विषयीचा इतिहास येथे देत आहोत.
१. ‘कोहिनूर’ हिरा परकीय आक्रमकांनी लुटणे
कृष्णा नदीच्या दक्षिण तटावरील पूर्वीच्या गोवळकोंडा येथील काकतिया राजवटीत कोळ्ळूरू या गावात असलेल्या खाणीमधून ‘कोहिनूर’ हिरा सिद्ध केला गेला.
१२ वे ते १४ वे शतक या कालावधीत काकतिया घराण्याचे सध्याचे तेलंगाणा,आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांच्या काही भाग यावर राज्य होते आणि ओरूगल्लू (वारंगल) ही त्यांची राजधानी होती. त्या वेळी १८६ कॅरेट दर्जाचा मानला गेलेला कोहिनूर हिरा तेथील भद्रकाली मंदिरात बसवला गेला. त्यानंतर वर्ष १२९० मध्ये देहली साम्राज्याचा संस्थापक अल्लाउद्दीन खिलजी याने त्या वेळी श्रीमंत असलेल्या दख्खन भागात लुटालूट करतांना तो हिरा कह्यात घेतला.
ब्रिटीश इतिहासकार बांबेर गॅसकॉग्न त्या ‘द ग्रेट मुघल्स’ या पुस्तकात म्हणतो, ‘‘वर्ष १५२६ मध्ये हुमायू या मोगल राजाने हा हिरा वडील बाबरला भेट दिला.’’ ‘गॅसकॉग्न’ याने दिलेल्या माहितीनुसार ‘या भेटीने प्रभावित न झालेल्या बाबरने या हिर्याची किंमत निश्चित केली. त्याच्या मते, ‘अडीच दिवस सर्व जगाला अन्न देता येईल एवढी त्याची किंमत ठरू शकते.’ हे त्याच्यासाठी क्षुल्लक असल्याने त्याने तो हिरा पुन्हा त्याच्या मुलाला दिला. त्यानंतर काही वर्षांनी हुमायूने हा हिरा त्याला आश्रय देणारा पर्शिया येथील शहा तहमास्प याला दिला. त्या वेळी हुमायूचा अफगाण येथील कट्टर शत्रू शेर शाह सुरी याने हुमायूच्या सैन्याचा पराभव करून त्याला भारतातून हद्दपार केले होते. एका मागून एक मालक पालटत जाऊन आणि त्यामुळे रक्तपात घडून शेवटी हा हिरा १७ व्या शतकातील मोगल सम्राट शाहजहां याच्या खजिन्यात जमा झाला. शाहजहां याने वर्ष १६३५ मध्ये हा हिरा स्वतःसाठी सिद्ध केलेल्या मयूर सिंहासनामध्ये बसवला.
२. कोहिनूर हिरा पर्शिया आणि अफगाण येथील आक्रमकांकडे जाणे
काही दशकानंतर माणिक, पाचू आणि हिरे यांनी जडवलेले शाहजहांचे प्रसिद्ध सोन्याचे सिंहासन पर्शियामधील लोभी राजा नादीर शाह वर्ष १७३८ मध्ये देहलीजवळ कर्नाल भागात झालेल्या युद्धात मोगल बादशाह महंमद शाह याचा पराभव करून पर्शियामध्ये नेले. नादीर शाह याचा नातू शाहरूख शाह याने त्यानंतर १८ व्या शतकात अफगाण साम्राज्याचा संस्थापक अहमद शाह दुर्राणी याला भेट म्हणून दिला आणि हा हिरा कित्येक वर्षे काबुलमध्ये राहिला; परंतु त्यानंतर या अशांत भागात ब्रिटिशांनी प्रवेश केला. वर्चस्ववादी ब्रिटीश आणि आणि दुसरा विस्तारवादी रशियन झार (राजा) यांनी कारस्थान करून अफगाणिस्तान कह्यात घेण्याचा डाव खेळला. या खेळीचा परिणाम म्हणजे दुर्राणी याचा नातू अफगाणचा राजा शाह शूजा याने ब्रिटिशांशी हातमिळवणी केली आणि हा सामर्थ्यशाली दिमाखदार हिरा दारूच्या पिंपात ठेवल्याची नोंद आहे.
३. इंग्लडंची राणी एलिझाबेथ हिच्या मुकुटात कोहिनूर हिरा बसवण्यात येणे
त्या वेळी काबुलमध्ये माऊंट स्टुअर्ट एलफिस्टन हा ब्रिटीश अधिकारी होता. त्यानंतर एलफिस्टन मुंबईचा राज्यपाल झाला. जून १८०९ मध्ये शूजा याला त्याचा वारस महमूद शाह याने पदच्युत केले. शूजा त्यानंतर लाहोर येथे शीख राज्यकर्ते महाराजा रणजित सिंह याच्या आश्रयाला आला. आश्रय दिल्याकारणाने शूजा यांना त्याने ‘कोहिनूर’ हिरा दिला. वर्ष १८४९ मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर पंजाब राज्य ब्रिटिशांनी कह्यात घेतले. यानंतर हा ‘कोहिनूर’ हिरा ब्रिटीश आयुक्त सर जॉन लॉरेन्स यांना देण्यात आला. हा हिरा त्यांच्या कोटाच्या (सदर्याच्या) खिशामध्ये ६ मास राहिला. त्यानंतर वर्ष १९३७ मध्ये हा हिरा इंग्लडंची राणी एलिझाबेथ हिचा पती जॉर्ज सहावा याच्या राज्याभिषेकाच्या वेळी राणीच्या मुकुटात बसवण्यात आला. वर्ष २००२ मध्ये राणीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिच्या शवपेटीवर ठेवण्यात आला. त्यानंतर हा हिरा ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे सुरक्षारक्षकांच्या कडकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला.
४. भारतीय मालकीचा कोहिनूर हिरा ब्रिटीश राणीने वापरणे कितपत योग्य ?
खरेतर या हिर्याची मालकी भारताकडे असून त्याला तो हिरा पुन्हा द्यावासे न वाटणे, हे ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. तसेच आजपर्यंत भारताच्या कोणत्याही पंतप्रधानाने या हिर्यावर दावा करून तो परत मागण्याचे धाडस केले नाही, हेही तितकेच लज्जास्पद आहे. भारतातून लूट करून नेलेल्या कित्येक मंदिरातील अमूल्य प्राचीन मूर्ती, दागिने, पुतळे आज ब्रिटनमधील संग्रहालयात आहेत. ब्रिटिशांची राणी तिच्या प्रजाननांच्या दृष्टीने चांगली असेल; परंतु तिला भारतात वसाहतवाद असण्याविषयी कोणतीही खंत नाही. तिने हा हिरा तिच्या दागिन्यामध्ये बसवला. हे कितपत योग्य आहे ?
– फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार (ऑक्टोबर २०२२)