‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’चे कार्य समाजहितकारक ! – राजेश नार्वेकर, आयुक्त
नवी मुंबईत ‘महास्वच्छता अभियान’
वाशी – ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने नवी मुंबईमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. ‘प्रतिष्ठानचे कार्य समाजहितकारक आहे’, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘महास्वच्छता अभियान’ राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये राबवण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
गांवठाण भागात देखील स्वच्छता अभियान राबवावे – आयुक्त राजेश नार्वेकर
#nmmcArea #DrAppasahebDharmadhikari @NMMCCommr @NMMConline @DrAppasaheb @NaviMumbaiCity @_navimumbaikar @NaviMumbaikars https://t.co/Lk6r2BKLdi
— Nave Shahar (@NaveShahar) March 1, 2023
नवी मुंबई शहरात पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये शहरातील सहस्रो श्री सदस्य सहभागी झाले होते.
या वेळी शहरातील सार्वजनिक परिसर, रुग्णालये, रस्ते, महाविद्यालये, शाळा, शासकीय कार्यालय या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये शहरातील ४ सहस्र ३०६ श्री सदस्यांच्या श्रमदानातून मोहीम पूर्ण करण्यात आली.
शहरातील २५५ किलोमीटरचा परिसर स्वच्छ करून २५ टन कचरा गोळा करून तुर्भे क्षेपणभूमीवर जमा करण्यात आला. सुका कचरा उचलण्यासाठी १६ वाहने वापरण्यात आली होती. ही स्वच्छता मोहीम महापालिका हद्दीतील आठ विभागांत राबवण्यात आली.