रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताने विशिष्ट भूमिका बजावली पाहिजे ! – अमेरिका

भारत, रशिया आणि युक्रेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – जी-२०चा अध्यक्ष म्हणून भारताने रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध समाप्त करण्यासाठी विशिष्ट भूमिका बजावली पाहिजे; कारण त्याचे रशियाशी अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच भारताकडे नैतिक स्पष्टतेने बोलण्याचीही क्षमता आहे, जी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पाहिली आहे, अशी भूमिका अमेरिकेने मांडली आहे. युद्ध थांबवण्यासाठी उपाय शोधण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची इच्छाही अमेरिकेने या वेळी व्यक्त केली.

भारताला कधी ना कधी युक्रेन युद्धाच्या संदर्भात एक बाजू घ्यावी लागेल ! – अमेरिकी खासदार मार्क वार्नर

भारत नैतिक मूल्यांचा अभिमान बाळगणारा एक शक्तीशाली देश आहे; मात्र त्याला कधी ना कधी युक्रेन युद्धाच्या संदर्भात कोणती तरी एक बाजू घ्यावी लागेल, असे अमेरिकेतील ज्येष्ठ खासदार मार्क वार्नर यांनी म्हटले आहे.

अनेक वर्षांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील चांगल्या संबंधांसाठी वार्नर प्रयत्न करत आहेत.

२ वर्षांपासून भारतात अमेरिकी राजदूत नसणे लज्जास्पद !

मार्क वॉर्नर यांनी पुढे म्हटले की, गेल्या २ वर्षांपासून भारतात अमेरिकेने तिचा राजदूत नियुक्त केलेला नाही. ही लज्जास्पद गोष्ट आहे.

या पदासाठी दावेदार असणारे एरिक गार्सेटी जर खासदारांची मते मिळवू शकत नसतील, तर त्यांच्या तुलनेच्या अन्य व्यक्तीच्या उमदेवारीवर विचार केला पाहिजे, असेही वॉर्नर यांनी सुचवले.