गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सहजसुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !
फाल्गुन पौर्णिमा (७ मार्च २०२३) या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…
फाल्गुन पौर्णिमा (७ मार्च २०२३) या दिवशी सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४५ वा वाढदिवस आहे.
सद्गुरु स्वातीताई पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे धर्मप्रचाराची सेवा करतात. तेथील ‘साधक आणि हिंदु धर्मप्रेमी यांची साधना कोणत्याही कारणाने थांबू नये, त्यांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांनी साधनेच्या पुढच्या टप्प्याला जावे’, यासाठी सद्गुरु स्वातीताई त्यांना पुष्कळ प्रेमाने समजावून सांगून साधनेसाठी उद्युक्त करतात. समाजातील हिंदु धर्मप्रेमींना साधनेसाठी कृतीशील करण्याचे त्यांचे कौशल्यही पुष्कळच सुंदर आहे आणि त्यासाठीची त्यांची तळमळही पुष्कळ आहे. त्यांनी ‘साधकांच्या साधनेची गती वाढावी’, यासाठी ‘परिवर्तन सत्संग’ आणि ‘भावसत्संग’ चालू केले. त्याचा साधकांना पुष्कळ लाभ होत आहे.
सनातनचे संत आणि सद्गुरु म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मानाच्या शिरपेचातील सुंदर रत्नेच आहेत. समष्टीसाठी सातत्याने आणि तळमळीने अखंड प्रयत्न करणार्या सद्गुरु स्वाती खाड्ये या गुरुदेवांच्या शिरपेचातील एक अग्रगण्य तेजस्वी हिराच आहेत. याचा वारंवार प्रत्ययही सनातनच्या साधकांना येत असतो. साधकांना मार्गदर्शनासाठी असे अमूल्य संतरत्न देणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सर्व साधक अनन्यभावे कृतज्ञ आहोत. साधकांना सद्गुरु स्वातीताईंविषयी वाटणारा कृतज्ञताभाव येथे दिला आहे.
सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी त्यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज.
१ अ. सर्वांशी जवळीक साधणे : ‘सद्गुरु स्वातीताई स्वतःला कधीच वेगळ्या समजत नाहीत. त्यांच्यातील ‘सहजता आणि मनमोकळेपणे बोलणे’ या गुणांमुळे त्या साधकांशी लगेच जवळीक साधतात.
१ आ. सतत उत्साही : सद्गुरु स्वातीताई कितीही लांबचा प्रवास करून आल्या, तरी त्या कधीच थकलेल्या नसतात. त्या सतत उत्साहाने अविरत सेवा करतात.
१ इ. सद्गुरु स्वातीताईंच्या मनात साधकांविषयी एकाच वेळी तत्त्वनिष्ठता, प्रेमभाव आणि पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवतो.
१ ई. नेमकेपणाने उपाय सुचवणे : सद्गुरु स्वातीताई भावसत्संगामध्ये व्यष्टी साधना भावपूर्ण होण्यासाठी, ‘सत्र करतांना, स्तोत्रे ऐकतांना भाव कसा ठेवायचा ?’, यांविषयी विविध सूत्रे सांगतात. त्यांनी आम्हाला देवावरची भक्ती आणि श्रद्धा वाढवण्यासाठी विविध बोधकथा अन् त्यागाची उदाहरणे सांगून साधनेच्या प्रयत्नांसाठी प्रेरणा दिली.
परिवर्तन सत्संगामध्ये त्यांनी ‘पोटात आहे; पण ओठावर नाही’, असे आपले कुठे आहे ?’, (मनात वेगळे विचार; पण ते न सांगता वेगळेच बोलतो) हे शोधून त्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न करायला उद्युक्त केले. त्या म्हणतात, ‘आपण सर्व जगाला फसवू शकतो; पण देवाला फसवू शकत नाही. ‘कितीतरी ठिकाणी आपला अहंकार आणि कर्तेपणा कसा जागृत असतो ?’, हे त्यांच्यामुळे आमच्या लक्षात येऊ लागले. स्वतःच्या चुका सांगणे आणि इतरांनी सांगितलेल्या चुका स्वीकारणे यांमुळे स्वतःच्या साधनेत असलेला अहंचा मोठा अडथळा दूर होतो; म्हणून ‘यात आपण कुठे न्यून पडतो ?’, याचे निरीक्षण करून प्रतिदिनच्या व्यष्टी आढाव्यात सांगायला सांगितले.
१ ई १. ‘सर्व सेवा माझ्या श्री गुरूंची असतांना त्यात वाटणी कशाला हवी ?’, असा सुंदर दृष्टीकोन देऊन मनाची नकारात्मकता घालवणे : काही प्रसंगांत माझ्या मनात ‘मीच ही सेवा का करू ? ही सेवा इतरांनीही करायला हवी’, अशा अयोग्य विचारांनी अपेक्षा आणि नकारात्मकता वाढली होती. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी ‘गुरुसेवेत वाटणी कशाला हवी ? सेवा माझ्याच गुरूंची आहे’, असा मला दृष्टीकोन दिला. त्या क्षणी मला माझ्यातील अहंची जाणीव होऊन ‘इतका सुंदर विचार मी कधीच करू शकले नाही’, याची खंत वाटली. यातून ‘त्यांची सेवा आणि साधना करण्याची कक्षा किती उच्च आहे अन् त्यांचा गुरुसेवेप्रती किती उच्च भाव आहे’, याची मला जाणीव झाली.
१ उ. साधकांमध्ये संघभावना निर्माण होणे : ‘साधकांची प्रगती व्हावी’, याचा जणूकाही त्यांना ध्यासच लागला आहे. त्या अतिशय तळमळीने साधकांना साधनेत साहाय्य करतात. सद्गुरु स्वातीताईंच्या तळमळीमुळे पश्चिम महाराष्ट्र, गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांमध्ये संघभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी एकत्रित समष्टी सत्संगांचे आयोजन केले. यामुळे एकाच वेळी सर्व उत्तरदायी साधकांमधे पालट होऊन अल्प कालावधीत साधकांनी संघभाव अनुभवला आणि समष्टी सेवेत सुसूत्रता आली.
१ ऊ. समष्टीला योग्य दिशेने कृतीप्रवण करण्याचे विलक्षण कौशल्य असणे : धर्मशिक्षणवर्गाला किंवा साधना सत्संगाला जोडणारे जिज्ञासू असो, वाचक किंवा हितचिंतक असो किंवा युवा साधक असो, सर्वांचा गुरुकार्यात सहभाग होऊन त्यांची साधना होण्यासाठी सद्गुरु स्वातीताई सतत नवीन संकल्पना राबवून सर्वांना जोडून घेत आहेत. त्यांच्यामध्ये समष्टीला योग्य दिशेने कृतीप्रवण करण्याचे विलक्षण कौशल्य आहे. सद्गुरु स्वातीताई समष्टीत कोणती अडचण आली; म्हणून कधीच थांबत नाहीत. त्या सतत उपायात्मक दिशेने विचार करतात.
१ ए. सद्गुरु स्वातीताई घेत असलेल्या सत्संगामुळे एकाच वेळी अनेक साधकांमध्ये भाव आणि सेवेची तळमळ जागृत होणे : सत्संगामध्ये सद्गुरु स्वातीताई घेत असलेली भावार्चना आणि प्रार्थना यांमुळे सत्संगात दैवी वातावरण निर्माण होऊन एकाच वेळी अनेक साधकांमध्ये समष्टी सेवेची तळमळ जागृत होते.
१ ऐ. सद्गुरु स्वातीताईंची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी काहीही, कधीही आणि कितीही करण्याची तळमळ असते.
१ ओ. कृतज्ञता : ‘सद्गुरु स्वातीताईंमुळेच आम्हाला ‘आम्ही साधनेत कुठे अल्प पडतो ? आम्ही कुठे थांबलो आहोत ? मायेत कसे गुरफटलो आहोत ?’, हे कळते. त्यांचे मार्गदर्शन नसते, तर आम्ही जीवनात भरकटलो असतो आणि दिशाहीन झालो असतो. केवळ त्या आहेत; म्हणून आमच्या जीवनाला वळण लागत आहे आणि आम्हाला साधनारत रहाण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु स्वातीताई आम्हाला तुमचेच प्रीतीरूप वाटतात. सद्गुरु स्वातीताईंच्या रूपाने तुम्हीच आमच्या समवेत आहात’, असे आम्हाला वाटते.
‘ज्यांच्याकडून एवढे अमूल्य ज्ञान आम्हाला मिळते, त्यांच्या ठायी किती सुंदर अमृताचा साठा असेल आणि त्यांचे मन किती शुद्ध अन् पवित्र असेल ! आम्ही सर्व साधक तुमच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
२. एक साधिका, पुणे
२ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांनी व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायला चालू केल्यापासून व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य येणे : ‘पूर्वी माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ अल्प आणि अनियमित असायचे. सद्गुरु स्वातीताईंनी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायला चालू केल्यापासून माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत हळूहळू सातत्य येत आहे. मी आधी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना सवलत घेत असे; परंतु ‘आता ही प्रक्रिया मनापासून करायला हवी’, अशी मला जाणीव झाली आहे.
२ आ. सद्गुरु स्वातीताईंनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेली सूत्रे मला सहजतेने कृतीत आणता येतात. तेव्हा ‘त्यांची संकल्पशक्ती माझ्यासाठी कार्यरत झाली आहे’, असे मला जाणवले.
२ इ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये बोलत असतांना ‘त्यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीच बोलत आहे’, असे जाणवून स्वतःवरील आवरण अल्प होऊन दिवसभर उत्साह जाणवणे : सद्गुरु स्वातीताई भावसत्संगात प्रार्थना सांगतात. तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द अंतर्मनात जाऊन माझा भाव जागृत होतो. सद्गुरु स्वातीताई बोलत असतांना ‘त्यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीच बोलत आहे’, असे मला जाणवते. मी भावसत्संगाला जोडायला चालू केल्यापासून माझ्यावरील आवरण अल्प होऊन दिवसभर मला उत्साह जाणवतो आणि मला गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरणही अधिक वेळा होते. ‘सद्गुरु स्वातीताईंच्या दैवी वाणीतील चैतन्यामुळे माझ्याकडून नामजपादी उपाय अधिक भावपूर्ण होत आहेत’, असे मला जाणवते.
२ ई. थकवा असतांना सद्गुरु स्वातीताईंचा आवाज ऐकून थकवा दूर होऊन उत्साह वाटणे : फेब्रुवारी २०२२ मध्ये मला पुष्कळ थकवा असल्याने सकाळी उठता येत नव्हते. मी झोपूनच भ्रमणभाषवर भावसत्संगाला जोडले होते. सद्गुरु स्वातीताईंचा आवाज माझ्या कानावर पडताच माझ्यावर पुष्कळ उपाय झाले आणि सत्संग संपेपर्यंत माझा थकवा दूर होऊन मला उत्साह वाटू लागला.
आम्हा सर्व साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांचा अंधकार दूर करून गुरुभक्तीचा दीप प्रज्वलित करणार्या सद्गुरु स्वातीताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
(पुढील भाग पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/659536.html)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |