भोसरी (पुणे) येथील श्री. कौशिक पाटील यांना वडिलांचे आजारपण आणि निधन यांवेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !
२.२.२०२३ या दिवशी भोसरी (पुणे) येथील श्री. कौशिक पाटील यांंचे वडील नानाजी पाटील (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ४.३.२०२३ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त वडिलांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनानंतर श्री. कौशिक पाटील यांना देवाने केलेले साहाय्य आणि त्यांना ‘देव समवेत आहे’, या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. वडील रुग्णालयात असतांना अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. वडील अतीदक्षता विभागात असल्याने मनातील भीतीचे विचार वाढणे, ‘मी बाबांची काळजी घेत आहे’, असे प.पू. गुरुदेव आतून सांगत असल्याचे जाणवणे आणि त्यांच्यावरील श्रद्धेमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जाता येणे : ‘२४.१.२०२३ या दिवशी माझ्या बाबांना अकस्मात् त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. बाबा अतीदक्षता विभागात असल्याने माझ्या मनातील भीतीचे विचार वाढू लागले. तेव्हा ‘तू घाबरू नकोस. मी बाबांची काळजी घेत आहे’, असे प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला आतून सांगत असल्याचे मी क्षणोक्षणी अनुभवले. ‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, या श्रद्धेने मी आधुनिक वैद्यांनी बाबांसाठी सांगितलेले सर्व उपचार करण्यासाठी आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकलो.
१ आ. ‘वडील देवाच्या अनुसंधानात असून आनंदी आणि शांत आहेत’, असे जाणवणे : आधुनिक वैद्यांनी ‘वडिलांना भेटू शकता’, असे सांगितल्यावर मी बाबांकडे गेलो. त्या वेळी त्यांची स्थिती बघून मला दुःख वाटत नव्हते. ‘ते देवाच्या अनुसंधानात आहेत. त्यांना वेदना होत असतांनाही अंतर्मनातून ते आनंदी अन् शांत आहेत’, असे मला जाणवले.
१ इ. आधुनिक वैद्यांनी वडील जिवंत रहाण्याची शाश्वती अल्प असल्याचे सांगणे आणि त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने स्थिर रहाता येणे : २६.१.२०२३ या दिवशी रात्री आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘बाबा जगण्याची शाश्वती अल्प आहे.’’ त्या वेळी मी हात जोडून प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करत असतांना मला जाणवले, ‘बाबा देवाशी काहीतरी बोलत आहेत.’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘बाबांना जे आवश्यक आहे, तेच देव करणार !’ त्यानंतर प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनाची स्थिती स्थिर होती. माझ्या या स्थितीचे मला आश्चर्यच वाटले. ‘रुग्णालयात प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत. ते मला आधार देऊन स्थिर ठेवत आहेत’, हे मी अनुभवले.
१ ई. दुसर्या रुग्णालयात अतीदक्षता विभागात ‘व्हेंटिलेटर बेड’ उपलब्ध नसूनही केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेने वडिलांसाठी ‘व्हेंटिलेटर बेड’चे नियोजन होणे : बाबांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना दुसर्या रुग्णालयात भरती करावे लागले. ‘बाबांना ज्या रुग्णालयात न्यायचे होते, त्या रुग्णालयातील अतीदक्षता विभागात ‘व्हेंटिलेटर (टीप) बेड’ उपलब्ध नाही’, असे समजले. माझ्या आधी ३ जणांना तसा ‘बेड’ हवा होता. केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेने संध्याकाळपर्यंत बाबांसाठी ‘व्हेंटिलेटर बेड’चे नियोजन झाले.
टीप – रुग्णाला कृत्रिम रित्या श्वासोच्छ्वास करण्यासाठी साहाय्य करणारे साधन.
१ उ. गुरुमाऊलींच्या कृपेने ५ – ६ घंट्यांमध्ये वडिलांच्या उपचारांसाठी पैशांचे नियोजन होणे : बाबांना रुग्णालयात भरती केले. तेव्हा रुग्णालयातील ३ दिवसांचा व्यय २ लाख ६५ सहस्र रुपये इतका झाला. त्या वेळी माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते; पण देवाच्या कृपेने ५ – ६ घंट्यांमध्ये पैशांचे नियोजन झाले. त्या वेळी ‘गुरुमाऊलीच या अडचणीत माझ्यासाठी लगेच धावून आली’, हे मी अनुभवले.
१ ऊ. जागरण होऊनही त्याचा काहीच त्रास न होणे : रुग्णालयात असतांना सलग ८ ते १० दिवस जागरण करूनही मला आणि माझ्या समवेत असणार्या माझ्या मामेभावाला (श्री. रोहित चौधरी यांना) काहीच त्रास झाला नाही. आम्ही रात्रभर जागे राहूनही आम्हाला सकाळी अखंड कार्यरत रहाता आले. गुरुदेवच आम्हाला ही ऊर्जा देत होते.
१ ए. रुग्णालयातील धावपळीच्या वातावरणातही माझ्या मनात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा नामजप सतत चालू होता. त्यामुळे ‘वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे मला जाणवले.
१ ऐ. रुग्णालयात बाबांना भेटायला येणारे नातेवाईक दुःखी आणि भावनाशील होत होते. गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा ‘प्रत्येक प्रसंगात माझी साधना कशी होईल आणि गुरुदेवांना काय अपेक्षित आहे ?’, असा विचार होत होता.
१ ओ. मी गुरुदेवांना सूक्ष्मातून प्रत्येक परिस्थिती सांगत होतो.
२. वडिलांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. वडिलांचे पाय पिवळसर दिसणे आणि ‘ते स्मितहास्य करत आहेत अन् ध्यानावस्थेत आहेत’, असे जाणवणे : २.२.२०२३ या दिवशी सकाळी १०.१५ वाजता ‘बाबांचे निधन झाले’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यांना पाहिल्यावर मला त्यांचे पाय पिवळसर दिसले. ‘ते स्मितहास्य करत आहेत आणि ध्यानावस्थेत आहेत’, असे मला जाणवले.
२ आ. दत्तगुरूंचा नामजप आतून चालू होऊन स्थिर रहाता येणे : बाबांचा मृतदेह घरी घेऊन आल्यानंतर आणि त्याच्या आदल्या दिवशीही माझा दत्तगुरूंचा नामजप आतून आपोआप चालू झाला. नामजपामुळे मला स्थिर रहाता आले. अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत मला नामजपामधील सातत्य अनुभवता आले.
२ इ. वडिलांचा मृतदेह घरी आणल्यावर आई भावनिक न होणे, तिच्याकडून दत्ताचा नामजप आपोआप होणे आणि ती स्थिर असणे : बाबांचा मृतदेह घरी आणल्यावर मला माझ्या आईची (श्रीमती सरला पाटील यांची) काळजी वाटत होती. बाबांचा मृतदेह घरी आणल्यावर माझी आई भावनिक झाली नाही. तिच्याकडून दत्ताचा नामजप आपोआप होत होता. बाबांचे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत ती स्थिर होती. ही केवळ आणि केवळ ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत आहेत’, याची प्रचीती होती.
२ ई. घरी आलेले नातेवाईक आणि साधक यांना घरातील वातावरण शांत अन् हलके वाटणे : दुसर्या दिवशी घरी नातेवाईक आणि साधक आले होते. त्यांनाही घरातील वातावरण शांत वाटत होते. श्री. महेशदादा (श्री. महेश पाठक, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) घरी आले होते. त्या वेळी त्यांनाही ‘घरात येताक्षणी प्रार्थना करावी’, असे वाटले. त्यांना घरातील वातावरणात हलकेपणा जाणवला.
३. कृतज्ञता
‘प.पू. गुरुदेव, या कठीण प्रसंगात तुम्ही क्षणोक्षणी माझ्या समवेत होता. तुम्ही माझी आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घेत होता; म्हणून या प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली. तुमच्याविना हे शक्य नव्हते. ‘तुमचे अस्तित्व मला सतत अनुभवता येऊ दे आणि तुम्हाला अपेक्षित असे मला घडता येऊ दे’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. ‘तुमच्या कृपेनेच मी ही सूत्रे लिहू शकलो’, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. कौशिक पाटील, भोसरी, पुणे. (९.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |