गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !
|
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – स्वधर्म वाचवण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसमवेत ५ पातशाह्यांशी प्राण पणाला लावून लढा दिला. त्यात गड-दुर्गांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. तेच गड-दुर्ग आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. पडझड, अस्वच्छता यांमुळे गड-दुर्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवून त्यांचे जतन, संवर्धन आणि रक्षण व्हावे, यासाठी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने ३ मार्च या दिवशी भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये राज्यभरातील २१ संघटनांचे शेकडो गड-दुर्ग प्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. मोर्च्यानंतर शासनाच्या वतीने पर्यटनमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या मान्य केल्या आहेत. पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.
या वेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘येत्या ३ मासांच्या आत गड-दुर्ग संरक्षण समिती गठीत करण्यात येईल, तसेच प्रतापगडाप्रमाणे विशाळगडासह अन्य सर्व गडांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर गड-दुर्ग प्रेमी संघटनांच्या समवेत बैठकीमध्ये चर्चा करून पुढील धोरण निश्चित करू. सर्व गडांवर पर्यटन चालू करून त्यातून रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीने आलो आहे. प्रतापगडाच्या पायथ्याचे अफझलखानाच्या कबरीभोवतालचे अतिक्रमण काढू शकेल, असा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते. अफझलखानवधाचे चित्र लावल्यावरही पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्यात येत होते; मात्र आपल्या सरकारने तेथील अतिक्रमण हटवले. रायगडाच्या संवर्धनासाठी समिती नेमली. हे सरकार तुमचे आहे.’’
सरकारने सौदी अरेबियाप्रमाणे गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवावे ! – रणजीत सावरकर
मोर्च्यानंतरच्या सभेत बोलतांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर म्हणाले की, हिंदूंमधील सद्गुणविकृतीमुळे गडांवर अतिक्रमण झाले आहे. इस्लाममध्ये ‘दर्गे, मजार (मुसलमानांचे थडगे) हे धार्मिक नाही’, असे म्हटले आहे. इस्लाममध्ये पार्थिवाचे पूजन करणे पाप आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये बुलडोझर लावून धार्मिक वास्तू तोडल्या आहेत. कुराणानुसार दर्गा, मजार, मशीद हे पवित्र नाहीत. ‘या केवळ इस्लामसाठी उपयुक्त गोष्टी आहेत’, असे कुराण सांगते. आमचे कोणत्याही धर्माच्या पूजा हक्कावर आक्रमण नाही. आमची मागणी कायदेशीर आहे. सौदी अरेबियामध्ये ज्याप्रमाणे इस्लामी वास्तू तोडण्यात आल्या, त्याप्रमाणे सरकारने गड-दुर्ग यांवरील इस्लामी अतिक्रमण हटवावे.
हिंदु राष्ट्राची स्थापना, हे शिवरायांचे स्वप्न ! – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष, धर्मसभा-विद्वत्संघ, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्यपीठ
मावळ्यांचे वंशज हिंदवी स्वराज्यासाठी लढले. माझ्या पूर्वजांनीही राष्ट्रासाठी योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष नव्हते. त्यांनी स्थापन केलेले साम्राज हे हिंदूंंचेच होते. त्यांच्या अष्टप्रधानमंडळामध्ये धर्माधिकारी हे पद धर्मव्यवस्थेसाठीच होते. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न आहे. वर्तमान सरकारवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे शासनाने आमचे म्हणणे समजून घ्यावे आणि गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण त्वरित हटवावे.
प्रतापगडाप्रमाणे सर्व गडांवरील अतिक्रमणे समयमर्यादेत काढून टाकावीत ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती आणि महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
जंजिरा दुर्गावरील भगवा ध्वज प्रशासनाकडून काढला जातो, मग काय तिथे हिरवा ध्वज चालतो का ? श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मागील ३२ वर्षे रायगडावर नियमितपणे दिवाबत्ती करतात. असे धारकरी आहेत, म्हणून हिंदु धर्म टिकून आहे. गड-दुर्ग यांवर इस्लामी अतिक्रमण होते, हे पुरातत्व विभागाच्या का लक्षात येत नाही ? गडाचे पीर व्हायला लागल्याने दुर्गप्रेमींना रस्त्यावर उतरावे लागले आहे. महाराजांनी गड-दुर्ग इस्लाममुक्त केले, त्यांवर पुन्हा इस्लामी अतिक्रमण झाल्यामुळे ते काढण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. मावळ्यांच्या वंशजांना आंदोलन करून यासाठी मागणी करावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे. गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारने महामंडळाची स्थापना करावी. सरकारने ज्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे राज्यातील सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे सरकारने समयमर्यादेत हटवावीत.
गड-दुर्ग राखण्याचे दायित्व प्रत्येक मावळ्याचे आहे ! – पुरुषोत्तम बाबर, मुंबई समन्वयक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूचे अतिक्रमण हटवले. त्याप्रमाणे अन्य गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण सरकारने निष्काशित करावे. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे, ही श्रींची इच्छा होती; परंतु हे हिंदवी स्वराज्य टिकवण्याचे दायित्व प्रत्येक मावळ्याचे आहेत.
‘धर्मासाठी कसे लढावे ?’ याची शिकवण गड-दुर्ग देतात ! – राहुल खैर, अध्यक्ष, मराठा वारियर्स
पुरातत्व विभागाकडे गडाची स्वच्छता करण्यासाठी मागणी करायला जातो, तेव्हा पुरातत्व विभाग आडकाठी करतो. त्यामुळे गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी सरकारने महामंडळ स्थापन करावे. हिंदूंनी यासाठी स्वत:ची ताकद दाखवावी. ‘धर्मासाठी कसे लढावे ?’ याची शिकवण गड-दुर्ग देतात. यासाठी अनेक संघटना हे कार्य करत आहेत. गड-दुर्ग वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
गडांच्या भूमीचे पावित्र्य जपले पाहिजे ! – विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यातील गडावर जाण्यासाठी सांगितले, तेव्हा ते सिंहगडावर गेले, तेथे त्यांची समाधी लागली. त्यानंतर ते उठले आणि तडक निघाले, त्यानंतर जो इतिहास घडला, तो आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हे या भूमीचे पावित्र्य असून ते जपले पाहिजे, यासाठी आई जगदंबामाता आपल्या पाठीशी आहे.
अन्यथा भविष्यात गड-दुर्गही दिसणार नाहीत ! – संदेश देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज
विशाळगडावर २१ मंदिरे होती. सध्या त्यांतील केवळ ११ मंदिरे शिल्लक आहेत. गडांवर कबरी बांधून त्यावरील हिरवी कापडे आताच हटवली नाहीत, तर भविष्यात त्या ठिकाणी दर्गे होतील. नवीन दर्गे नव्हेत, तर गडांवरील असलेल्या मंदिरांचे आपणाला संवर्धन करायचे आहे. अन्यथा भविष्यात गड-दुर्गही दिसणार नाहीत.
शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास जपण्याचे दायित्व आपले आहे ! – आनंदराव काशीद, वीर शिवा काशीद यांचे वंशज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जपण्याचे दायित्व आपले आहे. गड-दुर्ग यांचा हा इतिहास आपल्याला जपायला हवा. राजगडावरील अनेक वास्तू पडल्या आहेत. गडांवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष न करता त्या विरोधात गडप्रेमींनी एकत्र यायला हवे. गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक माहिती देणारे फलक लावायला हवेत.
मुख्यमंत्री मागण्या मान्य करतील, असा विश्वास आहे ! – अप्पासाहेब गायकवाड, कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज
श्रीमंत गायकवाड घराण्याचे वंशज ४ राज्यांमध्ये आहेत. यातील ४०० गावांच्या वतीने या महामोर्च्याला जाहीर पाठिंबा आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या मागण्या मान्य होतील, असा आम्हाला विश्वास आहे.
शिवरायांचा इतिहास कळण्यासाठी गड-दुर्ग जपले पाहिजेत ! – कुणाल मालुसरे (नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज)
वर्ष २००७ मध्ये राजगडावरील मूर्ती आणि तोफगोळे फेकून देण्यात आले. पोलिसांत तक्रार करूनही त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे गडांंना संरक्षण मिळावे, अशी सरकारकडे मागणी आहे. पुढील पिढीला शिवरायांचा इतिहास कळावा, यासाठी गड-दुर्ग जपले पाहिजेत.
दुर्गांच्या पाऊलखुणांचे जतन करणे आवश्यक ! – राम खुर्दळ, संस्थापक, शिवकार्य गडकोट संरक्षण समिती
दुर्ग संवर्धन जागृती सातत्याने चालू आहे; मात्र त्यात केवळ स्वच्छता अभियान करणे पुरेसे नाही. तर त्या जुन्या झालेल्या वास्तू आणि त्याच्या पाऊलखुणा जतन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करू ! – रवींद्र पडवळ, संस्थापक अध्यक्ष, समस्त हिंदु बांधव
गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी पुष्कळ गडप्रेमी संघटना अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सरकारने आतापर्यंत केवळ ५१ गडांचे सर्वेक्षण केले आहे. अद्याप अनेक गडांचे सर्वेक्षण व्हायचे आहेत. सरकारने वेळीच लक्ष दिले नाही, तर येत्या काही वर्षांत गड-दुर्ग नष्ट होतील. गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी आम्ही वर्ष २०१७ पासून करत आहोत. मागील वर्षी यासाठी आम्ही आझाद मैदानात आंदोलनही केले; मात्र अद्याप महामंडळाची स्थापना करण्यात आलेली नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार महामंडळ स्थापन करण्यात आले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू.
शिवरायांचा इतिहास विसरल्यामुळेच गड-दुर्ग यांवर अतिक्रमण ! – आशितोष झा
शिवरायांनी हाती घेतलेली मोहीम कधी सोडली नाही. ही भूमी आपली आहे. या भूमीवरील गड-दुर्गही आपले आहे. ‘धर्मासाठी झुंझावे’ हा शिवरायांचा इतिहास आपण विसरलो आहोत. त्यामुळेच गडांवर अतिक्रमण वाढत आहे. या अतिक्रमणासाठीचा पैसा हिंदूंच्या खिशातून येतो. हिंदू हलाल वस्तू विकत घेत आहेत. यातून मिळणारा पैसा आतकंवाद्यांचे खटले लढण्यासाठी वापरला जात आहे.
आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी आत्मशक्ती वाढवा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
धर्म, संस्कृती, इतिहास, भाषा, परंपरा हे सर्व मिळून राष्ट्र सिद्ध होते. गड-दुर्ग मिळून महाराष्ट्र झाला आहे. गडांवर अतिक्रमण झाल्याने तेथे आपले अस्तित्व पुसून टाकण्याचा भाग होत आहे का ?, याकडे लक्ष द्यायला हवेे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ मुसलमानी पातशाह्यांशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ती साधनेच्या बळावर ! आपल्याला आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करायचे असेल, तर आत्मशक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी कुलदेवीचे नामसमरण करावे.
गड-दुर्ग यांचे रक्षण करण्याची शपथ घेऊया ! – विश्वजीत देशपांडे (मोरोपंत पिंगळे यांचे वंशज)
जो समाज इतिहास विसरला, त्यांचे भविष्य अंधःकारमय असते. गड-दुर्ग यांसाठी आम्ही कधीही एकत्र येऊ. मग गुन्हे नोंद झाले, तरी हरकत नाही. यापुढे एकत्र येऊन दुर्गरक्षणाचे काम करण्याची शपथ घेऊया.
गड-दुर्गांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्च्यात सहभागी झालो ! – कु. सोहम अशोक वाघस्कर, नगर (बाल मावळा)
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-दुर्गांच्या रक्षणासाठी सरकारने महामंडळ स्थापन करावे, यासाठी मी येथे आलो आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामंडळ स्थापन करत असल्याचे सांगत नाहीत, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. मला आई-वडिलांनी मला गड-दुर्ग दाखवले; पण मला पुढच्या पिढीने विचारले, तर मी काय सांगणार ? आपल्या हक्काचे महामंडळ स्थापन केले नाही, तर येणार्या पिढीला पुरावे दाखवायला हे गड-दुर्ग शेष रहाणार नाहीत. मी गड-दुर्गांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आलो आहे.
विविध जिहादच्या विरोधात वेळीच संघटित होणे आवश्यक ! – चिराग गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप उत्तर भारतीय मोर्चा
देशभरात भूमी जिहाद, इस्लामीकरण, इस्लामी राष्ट्र, आर्थिक, लोकसंख्या अशा प्रकारचे जिहाद चालू आहेत. त्याला आम्ही विरोध करत आहोत. हे मोठे षड्यंत्र असून भविष्यात मोठे संकट उभे राहू नये; म्हणून आपण वेळीच संघटित होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्यापक कार्य चालू आहे. त्याला उत्तर भारतीय मोर्च्याचा पाठिंबा आहे.
गडांवरील दुःस्थितीची प्रशासनाने नोंद घ्यावी ! – राजन बापू रेडकर, कोकण प्रांत अध्यक्ष, महाराष्ट्र भ्रष्टाचार निवारण संस्था
यशवंतगडावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्या संदर्भात पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा केला; मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गडावरील संरक्षण भिंत ढासळली आहे, अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. त्यांची प्रशासनाने नोंद घेतली पाहिजे. गड-दुर्गांचे जतन करण्यासाठीचा जुना कायदा चुकीचा असून त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
मोर्च्यात सहभागी संघटना !
शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरीयर्स गड-दुर्ग संवर्धक संघटना, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई (वडाळा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ, हिंदु धर्मजागरण, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाचे धर्मसभा-विद्वत्संघ, सनातन संस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समस्त हिंदू बांधव संघटना, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वंदनीय उपस्थिती !
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, वसई येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला
मोर्च्यात सहभागी मावळ्यांचे वंशज !
तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई धाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज, सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज श्री. अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज श्री. अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज श्री. विश्वजित देशपांडे, कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज श्री. आनंदराव काशिद, श्री पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकीळ
क्षणचित्रे
- ‘गड-दुर्ग वाचवा, देश-धर्म वाचवा !’, अशी प्रेरणा देणारी घोषणा पोडियमवर लिहिली होती.
- व्यासपिठावर मागील बाजूस छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा वेश करून उभे राहिलेल्या गडप्रेमींनी वातावरणनिर्मितीत भर टाकली !