गड-दुर्गांवर भेट देणार्या पर्यटकांनो, याकडे लक्ष द्या !
राज्यातील विविध गडदुर्गांच्या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. अर्थात् या भेटींमागील बहुतांश पर्यटकांचा हेतू गड-दुर्गांवर जाऊन केवळ मौजमजा करणे, छायाचित्रे काढणे इतकाच असतो. इतिहासाची ओळख करून घेणे, संबंधित गडाचे हिंदवी स्वराज्याच्या काळात असलेले महत्त्व जाणून घेणे, यांविषयी त्यांना उत्सुकता नसते. त्यामुळे गडावरील निसर्गरम्य वातावरणातही त्यांच्याकडून अपप्रकार केले जातात. गडावरच कचरा टाकला जातो. पाण्याच्या बाटल्यांचा तर खच पडलेला असतो. प्लास्टिकच्या पिशव्याही टाकलेल्या असतात. सिगारेटची पाकिटेही दिसतात. हे चित्र सर्वत्र दिसतेच; पण याहीपेक्षा वेगळे म्हणजे गड-दुर्गांच्या भिंतींवर प्रेमीयुगुलांची नावे लिहून नवीन इतिहास निर्माण करण्याचा संतापजनक प्रकारही पर्यटकांकडून बरेचदा केला जातो. त्यामुळे शिवराय किंवा मावळे यांच्या विचारांचे स्मरण करून इतिहास जागवण्यापेक्षा प्रेमभावनांनाच ऊत येतो. यातून ऐतिहासिक वास्तूंचे विद्रूपीकरण करण्याचे महापापही केले जाते. काही भिंतींवर तर गुटखा किंवा तंबाखू थुंकून त्यांच्या पिचकार्या उडवलेल्या असतात. अशा किळसवाण्या प्रकारांमुळे गडांचे उरलेसुरले वैभवही नष्ट होते. गडांचे पावित्र्य भंग पावते. खरा इतिहासप्रेमी या प्रकारांमुळे संतप्त होतो किंवा दुखावला जातो. हे आणखी किती काळ असेच चालू द्यायचे ? पर्यटकांनो, हे प्रकार थांबवणे हे तुमचे समाज आणि राष्ट्र कर्तव्य आहे, याचे भान राखा ! केवळ इतिहास पहायला जाणे नव्हे, तर नवा इतिहास घडवणे तुमच्याच हातात आहे !
– श्री. सागर चोपदार, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती