हिंदवी स्वराज्याचे शिलेदार ठरलेल्या गडदुर्गांची दु:स्थिती !
शीवगड (मुंबई)पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या शीवगडाची दुरवस्था !पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागून असलेल्या शीवगडाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे गडाची दुरवस्था झाली आहे. आणखी दुर्लक्ष झाल्यास यावरील बांधकाम नामशेष होण्याची भीती आहे. पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक वास्तू असूनही ती टिकून रहावी, यासाठी प्रयत्न होत नाहीत. शीवगड पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ‘प्राचीन संरक्षित स्मारक’ आहे. |
दुर्गाडी गड (कल्याण)गडावर धर्मांधांचे अतिक्रमण !छत्रपती शिवरायांनी भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ दुर्गाडी गडावर रोवली. त्या गडावर अवैधपणे बांधलेल्या ‘ईदगाह’ला (ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा) २४ घंटे पोलीस संरक्षण देण्यात आले असून तेथे हिंदूंना कायमस्वरूपी प्रवेशबंदी आहे. श्री दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागे ‘ईदगाह’ची जागा आहे. तेथे जाण्यासाठी धर्मांधांना स्वतंत्र रस्ता बांधून देण्यात आला आहे. तेथे वर्षातून २ वेळा नमाजपठण करण्यात येते. तेथे २४ घंटे पोलीस संरक्षण असते. |
वांद्रेगड (मुंबई)
अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळलेला मुंबईतील वांद्रेगड !
मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे. गडावरील काही बांधकामही पूर्णपणे पडले आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर भविष्यात गडाच्या अन्य भिंतीही पडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ‘प्राचीन संरक्षित स्मारक’ म्हणून या गडाचा समावेश होतो. हा गड समुद्रालगतच असल्यामुळे सागरी लाटांमुळे काही प्रमाणात गडाच्या बांधकामाला धक्का पोचला आहे; मात्र काही वर्षांपूर्वी गडाच्या बाहेर बांधण्यात आलेल्या संरक्षित कठड्यामुळे सध्या लाटांपासून गडाचे रक्षण होत आहे.
धारावी (मुंबई)
‘धारावी’ गडावर मद्यपी आणि तृतीयपंथीय यांचा अड्डा !
‘काळा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा धारावीतील ‘धारावी’ हा गड केवळ नावाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ राहिला आहे. गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे यांसाठी होत असून गडावर दिवसाढवळ्या हे प्रकार चालू आहेत. गडावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे.
पुरातत्व विभाग आणि आजपर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे या गडाचे ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले असून हा गड म्हणजे मद्यपी आणि तृतीयपंथीय यांचा अड्डा झाला आहे.
धारावीचा गड हा मिठी नदीच्या पात्रात आहे. हा गड नदीच्या पात्रात असला, तरी सद्यःस्थितीत पात्रात भराव टाकून गडाच्या चारही बाजूला झोपडपट्टी आणि घरे बांधण्यात आली आहेत. हा गड सर्व बाजूंनी झोपडपट्टीने वेढल्यामुळे ‘येथे गड आहे’, हेच लक्षात येत नाही. गडावर चढण्यासाठी मार्ग नाही. त्यासाठी लोखंडी पायर्यांची शिडी करण्यात आली आहे.
विशाळगड (कोल्हापूर)
विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे !
येथे १०० हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. ज्या शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाची साक्ष या भूमीत आहे, त्यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. शिवरायांच्या सूनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहानबाबा दर्ग्याच्या परिसराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी ‘पेव्हर ब्लॉक’चा रस्ता आहे, दर्ग्याचेही आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे.
विजयदुर्ग (सिंधुदुर्ग)
महाद्वारासमोरील पहिली तटबंदी कोसळलेली !
गडाच्या महाद्वारासमोरील पहिली तटबंदी अनेक ठिकाणी कोसळली आहे. गडाच्या पडकोट खुष्क (भूमीवरच्या) भागात प्रवेश करण्यापूर्वी असलेल्या तटबंदीवर वाढलेले गवत आणि झाडे दिसतात. गडाकडे जातांना भव्य तटबंदी समोर दिसते; मात्र गवत आणि झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने तटबंदीला धोका उत्पन्न झाला आहे.
दरवाजा नसलेली जिबी
पडकोट खुष्क भागातून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो. गडाचे हे दुसरे प्रवेशद्वार आहे. येथे ‘जिबीचा दरवाजा’ म्हणून पाटी लावलेली आहे; मात्र येथे दरवाजा दिसत नाही.
जिबीचा दरवाजा आणि गडाचे महाद्वार यांमधील कोसळलेली तटबंदी
३ ऑगस्ट २०२० या दिवशी जिबीचा दरवाजा आणि गडाचे महाद्वार यांमधील दुसरी चिलखती तटबंदी (अनुमाने ३० ते ४० फूट) कोसळली. त्याच्या पहाणीसाठी राजकारणी, नेते आणि लोकप्रतिनिधी येथे येऊन गेल्यावर त्याची वृत्ते छायाचित्रांसह प्रसिद्ध झाली. पुरातत्व विभागानेही आश्वासने दिली; मात्र अद्याप तटबंदीचे काम करण्यात आलेले नाही.
नगारखान्यासमोरील परिसराची दुःस्थिती
नगारखान्यासमोरील (नगारा वाजवण्यासाठी बसायची जागा) तोफांच्या मागे पोलीस चौकी आणि पुरातत्व विभाग कार्यालयाची वास्तू आहे. वास्तूच्या दोन्ही बाजूंचे बांधकाम ढासळले आहे. छप्पर मोडकळीस आले असून कौलेही पडली आहेत.
टेहळणी बुरुजाच्या दुभंगलेल्या भिंती आणि दुर्लक्षित शिवमंदिर
खलबतखान्यासमोरील टेहळणी बुरुजाच्या ठिकाणी ध्वजस्तंभ आहे. यावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकत असे; पण आता तेथे ध्वज नाही. बुरुजाच्या भिंती गवत आणि झाडे वाढून दुभंगल्या आहेत. तेथे असलेल्या छोट्या शिवमंदिराची स्थिती वाईट झाली आहे.
पारोळा (जळगाव)
गडाच्या अनेक भागांची पडझड झाली आहे. भिंतींवर झाडे आणि वेली उगवल्या आहेत. काही नागरिक गडाचा वापर शौचालय आणि मुतारी म्हणून करतात. मद्य पिणे, जुगार खेळणे आदी अपप्रकार चालू आहेत. आवारात कचरा टाकला जातो. परिसरात चिखल, तसेच घाण आहे. अस्वच्छतेमुळे डुकरांचा वावर अधिक आहे. गडाच्या बाजूच्या खंदकामधील पाण्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात आहे.
यावल (जिल्हा जळगाव) येथील राजे निंबाळकर गड (भुईकोट गड)
या गडावरील एकूण ९ बुरुजांपैकी २ बुरूज पूर्णपणे ढासळले आहेत, २ बुरूजांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. गडामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेले पहिले पूर्वाभिमुख दार आणि दुसरे उत्तराभिमुख दार आज केवळ अवशेष रूपाने शिल्लक आहे.
नदीच्या दिशेने (पश्चिमेकडील) असलेली गडाची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. बुरुजांमध्ये झाडे उगवू लागल्यामुळे तेथे मोठमोठे तडे जाण्यास प्रारंभ झाला आहे.
गडाच्या दक्षिणेकडील बाजूने शाबूत असलेली तटबंदी मागील काही वर्षांपासून हळूहळू ढासळायला लागली आहे. बुरूज तर येत्या काही वर्षांत भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत.
लोहगड (पुणे)
पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा !
दळणवळण बंदीच्या अंतर्गत राज्यात गड-दुर्ग येथे प्रवेशबंदीचा शासनआदेश असतांनाही तो डावलून लोहगडावर दर्ग्याचे (दर्गा म्हणजे मुसलमान सिद्धपुरुषाचे समाधीस्थळ.) अवैध बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे प्रवेशबंदीचा आदेश असतांना पुरातत्व विभागाने या अवैध बांधकामासाठी गडाचे दरवाजे उघडले.
कोरोना महामारीच्या काळात लोहगडावरील अवैध थडग्याच्या भोवती ५-६ फूट उंचीच्या पक्क्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. भिंतींचे काम पूर्ण झाले असून आता त्यावर केवळ छत टाकण्याचे काम शेष आहे. विशेष म्हणजे या भिंतींसाठी गडावरीलच दगड वापरण्यात आल्याची चर्चा आहे.
पहाडेश्वर पर्वत (ठाणे)
ठाणे येथील पहाडेश्वर आणि कार्तिक गणेश पर्वत बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !
ठाणे येथील श्री नवनाथांचे स्थान असलेले श्रीक्षेत्र मलंगगड बळकावल्यानंतर आता त्याच्या बाजूला असलेल्या पहाडेश्वर पर्वतावरही धर्मांधांनी ९ आणि गडाखाली २ थडगी उभारून या ठिकाणी धार्मिक स्थळ निर्माण केले आहे. पर्वतावरील पुरातन शिवपिंडी आणि नंदी फेकून देऊन त्या ठिकाणी ही ९ थडगी बांधण्यात आली आहेत. धर्मांधांच्या या अवैध बांधकामाकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे.
धर्मांधांकडून पहाडेश्वर पर्वताचे ‘दादी माँ पर्वत’, तर कार्तिक-गणेश पर्वताचे ‘पाच पीर पर्वत’ असे नामकरण प्रचलित करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र मलंगगडाचे ‘हाजी मलंग’ असे नाव प्रचलित केल्यानंतर त्याच पद्धतीने नावे पालटून आता बाजूचे पर्वतही बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत.
धर्मांधांनी या पर्वतावर उंच लोखंडी पाईपवर २ हिरवे ध्वज उभारले आहेत. पर्वतावरील सर्व थडग्यांना हिरव्या चादरी चढवून पर्वताचे इस्लामीकरण करण्यात आले आहे.