ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद ! – सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण
आमदार राजन साळवी यांनी उपस्थित केला होता तारांकित प्रश्न
मुंबई – राज्यातील चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून निधीची मागणी केली होती. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘रस्ता तातडीने होणे आवश्यक होते; परंतु निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्याला १० कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यामुळे येणार्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे’, असे सांगितले.
डॉ. राजन साळवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये म्हटले आहे की, अतीवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट बंद असतांना राजापूर येथील अणुस्कुरा घाटमार्गे वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे मागील दोन वर्षांत अवजड वाहनांनमुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केला असून सद्यस्थितीत ११ कि.मी.चे काम चालू आहे. १४ कि.मी. रस्ता सुस्थितीत आहे आणि उर्वरित १०कि.मी. रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासह डांबरीकारणासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार का ? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.