(म्हणे) ‘डॉ. आंबेडकर यांनी फेकून दिला तो सनातन धर्म पुन्हा आणायचा का ?’ – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत हिंदु धर्मावर गरळओक !
मुंबई, २ मार्च (वार्ता.) – योगी आदित्यनाथ यांनी सार्वजनिक भाषणात सनातन धर्म हा केवळ ब्राह्मण आणि गायी यांचे रक्षण करणारा धर्म असल्याचे म्हटले. असा सनातन धर्म आम्हाला मान्य नाही. सनातन धर्म आणणे म्हणजे रूढी आणि परंपरा पुन्हा आणणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फेकून दिला, तो सनातन धर्म पुन्हा आणायचा का ? अशी हिंदु धर्माविषयी गरळओक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली. २ मार्च या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी आव्हाड यांनी हिंदु धर्माला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न केला.
या वेळी हिंदु धर्मावर गरळओक करतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘आमच्या जातीवर अन्याय होत असेल, तर आम्ही सहन करायचा का ? ‘रूढी आणि परंपरा यांना जपणारा धर्म’ असा ‘डिक्शनरी’मध्ये ‘सनातन’चा अर्थ आहे. सनातन धर्मामुळे आम्ही ५ सहस्र वर्षे मागे फेकलो गेलो. सनातन धर्मातील रूढींमुळे आमच्यातील काही जणांना देवळात जाता येत नव्हते, पाणी पिता येत नव्हते. असा धर्म पुन्हा आणायचा का ? (‘हे विश्वची माझे घर’, असे केवळ सनातन धर्मातच म्हटले आहे. हिंदु धर्मामध्ये कुणाला जातीच्या आधारे हीन वागणूक द्यावी, असे म्हटलेले नाही. सनातन परंपरेतील ऋषीमुनींनी विविध वर्णांतून येऊन त्यांनी ऋषिपद प्राप्त केले आहे. काही अपवादात्मक घटनांसाठी कुणी धर्माला नावे ठेवू शकत नाही. कित्येक राजकारणी भ्रष्ट आणि स्वार्थी असतात; म्हणून राज्यकारभारच नको असे कुणी म्हणत नाही. – संपादक) असा धर्म आणून राज्यघटना मागे घालायची का ? शाहू महाराज यांचे विचार मागे ढकलायचे का ? सनातन धर्म पुन्हा आणणे म्हणजे रूढी आणि परंपरा पुन्हा आणणे. पुन्हा अस्पृश्यता आणि वर्णवाद आणण्यासारखे आहे. बहुजन जागा झाला नाही, तर वाटोळे होईल. (बहुजनांमध्ये आव्हाड यांच्यासारखे द्वेष पसरवत असल्यामुळे खरे तर वाटोळे होईल ! – संपादक)
भाजप आणि शिवसेना आमदारांचा सभागृहात हिंदु धर्मांचा जयजयकार !
या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी सभागृहात ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’ अशा घोषणा देत आव्हाड यांच्या हिंदुद्वेषी वक्तव्याचा निषेध केला. या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी आव्हाड यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर तालिका सभापती योगेश सागर यांनी वक्तव्य पडताळून कार्यवाही करणार असल्याचे म्हटले.
संपादकीय भूमिका
|