पुरातत्व विभागाची हिंदु विधीज्ञ परिषदेला माहिती राज्य पुरातत्व विभागातील ३०० पैकी १३२ पदे रिक्त !
मुंबई, २ मार्च (वार्ता.) – राज्य पुरातत्व विभागामध्ये ३१ मार्च २०२२ च्या स्थितीनुसार ३०० पदे संमत करण्यात आली आहेत. त्यांपैकी तब्बल १३२ पदे रिक्त आहेत, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांना देण्यात आली. पुरातत्व विभागातील रिक्त पदे भरण्याविषयी ६ एप्रिल २०२२ या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्र पाठवले होते.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या पत्राला राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी दिलेल्या उत्तरामध्ये ‘सरळसेवा कोट्यातील पदांची सुधारित बिंदूनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर चालू असून अंतिम टप्प्यात आहे. बिंदूनामावलीस मान्यता मिळाल्यानंतर पदभरतीची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील’, असे म्हटले आहे.