श्रीमंत देशांमुळे होणार्या जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसतो ! – पंतप्रधान मोदी
जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची देहली येथे बैठक
नवी देहली – जगातील महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था मोठ्या आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अनेक वर्षांच्या प्रगतीनंतर आज आपण शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये मागे जाण्याचा धोका पत्करला आहे. अनेक विकसनशील देश सध्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अशा कर्जाखाली दबले गेले आहेत, जे ते हाताळण्यास असमर्थ आहेत. श्रीमंत देशांमुळे होणार्या जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसतो. यामुळे भारताने ‘जी-२०’च्या अध्यक्षतेखाली दक्षिण भागाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला आहे, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. येथे जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्ससह जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.
G20 Foreign Ministers Meeting: Developed Nations Can’t Claim Global Leadership Without Listening to Affected Countries, Says PM Narendra Modi@narendramodi @PMOIndia#G20ForeignMinistersMeeting #NarendraModi #G20 #GlobalLeadership #DevelopedNations https://t.co/9BzaRp8SuU
— LatestLY (@latestly) March 2, 2023
बैठकीच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण अशा वेळी भेटत आहोत, जेव्हा जगात खोलवर फूट पडली आहे. गेल्या काही वर्षांत आपण आर्थिक संकट, हवामान पालट, साथीचे रोग, आतंकवाद आणि युद्ध पाहिले. यावरून ‘ग्लोबल गव्हर्नन्स’ अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही सूत्रांवर एकमत झाले नाही, तरी एकत्र येऊन तोडगा काढू ! – डॉ. एस्. जयशंकर
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर या वेळी म्हणाले की, जी-२० देशांवर एक विलक्षण दायित्व आहे. जागतिक संकटाच्या काळात आपण पहिल्यांदा एकत्र आलो आणि आज पुन्हा एकदा कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, हवामान पालट अशा अनेक संकटांना तोंड देत आहोत. या सूत्रांवर आपले एकमत असलेच पाहिजे, असे नाही; पण एकत्र येऊन तोडगा काढावा लागेल.