अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकर्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
रत्नागिरी – येथील अॅल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतलेल्या भूमी सरकारने परत कराव्यात किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे भूमीचा मोबदला शेतकर्यांना द्यावा, या मागणीसाठी अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरीसंघाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मार्च या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.
वर्ष १९७५ मध्ये अॅल्युमिनिअम (BALCO) प्रकल्पासाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकर्यांची १२०० एकर भूमी संपादित करण्यात आली; मात्र त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी आस्थापनांना देण्यात आल्या. त्यामुळे या शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली असून या शेतकर्यांना त्यांच्या जागा परत द्याव्यात अथवा आजच्या बाजारभावाप्रमाणष मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची दखल आतापर्यंत सरकारने न घेतल्याने या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी आक्रमक झालेल्या शिरगाव आणि परिसरातील प्रकल्पबाधित शेतकर्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यात सुमारे १५० शेतकरी सहभागी झाले होते.
या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांचीही शेतकरीसंघाच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना या मागणीचे निवेदन दिले. या वेळी जिल्हाधिकार्यांनी ‘आपण हे निवेदन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे (एम्आयडीसीकडे) वर्ग करू आणि शेतकर्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू’, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरीसंघाचे राजन आयरे, प्रसन्न दामले, चंद्रशेखर नातोंडकर, उमेश खंडकर, सलील डाफळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा –
अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधितांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
https://sanatanprabhat.org/marathi/658235.html